IMG-LOGO
राष्ट्रीय

भाजपच्या रॅलीवर दगड, चपलांचा वर्षाव

Monday, Jan 04
IMG

रॅलीनंतर विजयवर्गीय यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ममता सरकारवर निशाणा साधला. आधी पोलिसांनी रॅलीला अनुमती दिली नाही.

कोलकाता, दि. ४ डिसेंबर  : पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीवर दगडफेक आणि जोडे-चप्पल फेकण्यात आल्या. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पश्‍चिम बंगालचे मंत्री फिरहाद हकीम यांच्या मतदारसंघात आज विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात भाजपची रॅली काढण्यात आली. या रॅलीत काही अज्ञातांनी दगडफेक केली. त्याचबरोबर रॅलीवर जोडे आणि चपला फेकण्यात आल्या; मात्र तरीदेखील रॅली पार पडली. रॅलीवर झालेल्या दगडफेकीवरून भाजपने तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा दावा केला आहे. या रॅलीला सुरुवातीला पोलिसांचा विरोध होता; मात्र भाजप नेत्यांनी विनंती केल्यानंतर रॅलीला अनुमती देण्यात आली. पोलिसांनी सुरुवातीला अनुमती नाकारल्यामुळे या रॅलीला उशिर झाला. या रॅलीत कैलाश विजयवर्गीय यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय, खासदार अर्जुन सिंह यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली अलीपूर येथून हेस्टिंग येथील भाजप कार्यालयापर्यंत निघाली होती. रॅलीनंतर विजयवर्गीय यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ममता सरकारवर निशाणा साधला. आधी पोलिसांनी रॅलीला अनुमती दिली नाही. त्यानंतर हेस्टिंगपर्यंत अनुमती देण्यात आली. प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले. एकदम शांततेत रॅली काढण्यात आली. पश्‍चिम बंगालमध्ये कशाप्रकारे तानाशाही सुरू आहे, त्याचे हे ताजे उदाहरण आहे. पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष राजकीय कामकाज करू शकत नाही. पाच दिवसांपूर्वी अर्ज दिल्यानंतरही रॅलीला अनुमती दिली गेली नाही, असा आरोप त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात ते सुदैवाने बचावले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बंगालच्या दौर्‍यावर असताना त्यांची प्रचारसभा संपल्यानंतर घराकडे निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला.

Share: