IMG-LOGO
COVID-19

भारताकडून सहा देशांना कोरोनाची लस

Thursday, Jan 21
IMG

कोरोना विषाणूची लस भारताकडून अनुदानित मदत घेणा-या सहा देशांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नवी दिल्ली, दि. २१ जानेवारी :  भारताने मित्रधर्म निभावला असून सहा देशांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्यापैकी काही देशांना कोरोनाची लस रवाना झाली आहे. कोरोना विषाणूची लस भारताकडून अनुदानित मदत घेणा-या सहा देशांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. या देशांमध्ये भूतान, मालदीव, बांग्ला देश, नेपाळ, म्यानमार आणि सेशल्स सारख्या देशांचा समावेश आहे. गेल्या शनिवारी म्हणजेच 16 जानेवारीपासून भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. मागील वर्षाच्या सुरुवातीस, भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि पॅरासिटामॉलला 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना औषध म्हणून पाठविले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे लस निर्यातीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की जागतिक समुदायाच्या आरोग्याच्या गरजा भागविण्यासाठी दीर्घकालीन विश्वासू भागीदार म्हणून भारताचा गौरव झाला आहे. ब-याच देशांना कोरोना लसीचा पुरवठा सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांत आणखीही देशांची संख्या वाढेल.कोरोना लस प्रथम भूतान आणि मालदीवमध्ये निर्यात केली गेली. दीड लाख डोस भूतानला तर मालदीवला एक लाख डोस पाठवले गेले. भारत सरकार सीरम संस्थेची लस सर्व देशांना भेट म्हणून पाठवत आहे. संबंधित देशांच्या अधिका-यांनाही लस देण्यापूर्वी दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. दरम्यान, अलिकडच्या काळात ब-याच देशांनी कोरोना लसीचा लवकर पुरवठा सुरू करण्यासाठी भारताकडे संपर्क साधला आहे. यामध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका आणि मॉरिशससारख्या शेजारी देशांचा समावेश आहे. भारत लवकरच पहिल्या टप्प्यात या देशांच्या लसीकरणाची घोषणा करणार आहे. मालदीव सरकार प्रथम कोरोना साथीच्या विरूद्ध लढा देणारे आपले आरोग्य कर्मचारी, इतर योद्धा आणि पोलिसांना लस देण्याची योजना आखत आहे. कोविशिल्डच्या 20 लाख डोसचे गुरुवारी बांगला देशात आगमन होईल.

Share: