ममता या नंदीग्रामहून परत आल्यानंतरची त्यांची ही पहिलीच सार्वजनिक सभा आहे.
कोलकात्ता, दि. १४ मार्च : उमेदवारी अर्ज भरून परत निघत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. हा अपघात असल्याचे सांगितले जात असले, तरी तृणमूल काँग्रेसने मात्र हा घातपाताचा कट असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या उपचारानंतर ममता बॅनर्जी प्रचारासाठी कोलकाताच्या रस्त्यांवर परत आल्या. मुख्य म्हणजे या वेळी त्या व्हीलचेअरवर होत्या. कोलकात्ताच्या मध्यभागी असलेल्या मेयो रोड ते हाजरा येथे मुख्यमंत्री विशाल मेळाव्याचे नेतृत्व करताना दिसल्या. त्यांचा रोड शो सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ट्वीट केले, की आम्ही धैर्याने लढा सुरूच ठेवू! मला अजूनही खूप वेदना होत आहेत; पण मला माझ्या लोकांच्या वेदनादेखील अधिक जाणवत आहेत. आमच्या सन्माननीय भूमीचे रक्षण करण्यासाठी या लढाईत, आम्ही बरेच काही सहन केले आहे आणि अधिक त्रास सहन करावा लागला, तरी आम्ही कधीही झुकणार नाही!ममता या नंदीग्रामहून परत आल्यानंतरची त्यांची ही पहिलीच सार्वजनिक सभा आहे. त्याआधी रविवारी ममता बॅनर्जी यांनी 2007 मध्ये नंदीग्राम येथे पोलिस गोळीबारात ठार झालेल्या आंदोलकांना श्रद्धांजली वाहिली आणि पीडितांच्या सन्मानार्थ आणि बंगालविरोधी शक्तींशी लढण्यासाठी त्यांनी हा मतदारसंघ निवडला आहे, असे त्या म्हणाल्या. 2007 मध्ये भूसंपादनाच्या विरोधातील हल्ल्यात ठार झालेल्या 14 जणांच्या सन्मानार्थ तृणमूल काँग्रेसने 14 मार्चला ‘नंदीग्राम दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय आक्रोश वाढला होता आणि कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.