राज्यात तीन-चार दिवसांचा किंवा वीकएंड कर्फ्यू लावण्याची गरज असल्याचे मत गुजरात उच्च न्यायालयाने व्य्क्त केले.
अहमदाबाद, दि. ६ एप्रिल : भाजपशासित गुजरातमध्ये वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने टाळेबंदी करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयासमोर कोरोना संकटासंबंधी एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर, राज्यात कोरोना संकट रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्याची गरज आहे, असे सांगत उच्च न्यायालयानं ढिम्म राज्य सरकारला चपराक लावली.राज्यात तीन-चार दिवसांचा किंवा वीकएंड कर्फ्यू लावण्याची गरज असल्याचे मत गुजरात उच्च न्यायालयाने व्य्क्त केले. राज्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी टाळेबंदी लागू करणे आवश्यक असल्याचे आणि त्यासंबंधी राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले. गुजरातमध्ये प्रत्येक दिवशी समोर येणार्या रुग्णांचा आकडा होळीनंतर एक हजाराच्या पुढे गेला. सध्या राज्यात 16 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सुरत शहरात परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे दिसून येते. शहरात जवळपास चार हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर रुग्णसंख्येच्या बाबतीत अहमदाबाद, वडोदरा, राजकोट यांसारख्या शहरांचा क्रमांक लागतो. राज्य सरकारने रुग्णालयांत कोरोना रुग्णांसाठी बेडस् रिझर्व्ह करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी रुग्णालय आणि इतर ठिकाणी मुखपट्टी एक रुपयाला विकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत तीन लाख 21 हजार 598 नागरिकांना कोरोनाने गाठले. त्यातील 16 हजार 252 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर तीन लाख 765 नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली. आतापर्यंत चार हजार 581 रुग्णांनी कोरोना संक्रमणामुळे आपले प्राण गमावले.