गृहमंत्री देशमुख फेब्रुवारीच्या संबंध महिन्यात कोरोनामुळे रुग्णालय आणि नंतर गृह विलगीकरणात होते.
सिंग यांच्या पत्राचीच चिरफाड; पवार यांनी आरोप ठरविले निराधारनवी दिल्ली, दि. २३ मार्च : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या शंभर कोटी रुपयांच्या टार्गेटच्या आरोपावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा नाही, असा निर्णय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंग यांच्या पत्राची चांगलीच चिरफाड केली.सिंग यांच्या आरोपावर पवार यांनी दिल्लीत रविवारी रात्री उशिरा अजित पवार, जयंत पाटील, कमलनाथ, विनायक राऊत, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासोबत दोन तास चर्चा केली. त्यानंतर पाटील यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. त्यानंतरही लोकसभेत या प्रकरणावर भाजपच्या नेत्यांनी हंगामा केला. महाराष्ट्रात चार पक्षांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. आमदार राम कदम यांनी देशमुख यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली, तर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय जाहीर केला. या पार्श्वभूमीवर पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. गृहमंत्री देशमुख फेब्रुवारीच्या संबंध महिन्यात कोरोनामुळे रुग्णालय आणि नंतर गृह विलगीकरणात होते. मग त्यांनी सचिन वाझे यांना बोलावून वसुलीचे आदेश दिले असे सिंग कशाच्या आधारावर म्हणतात, असा सवाल करतानाच वाझे-देशमुख भेटीची माहिती चुकीची असल्याचा दावा पवार यांनी केला. या वेळी त्यांनी फेब्रुवारी महिन्यातील घटनाक्रमच विशद केला. तसेच देशमुख या काळात रुग्णालयात असल्याची कागदपत्रेही त्यांनी सादर केले. सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून पाच ते 15 फेब्रुवारीपर्यंत देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. त्यानंतर 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत ते गृहविलगीकरणात होते, असे निदर्शनास आणून कशाच्या आधारावर देशमुख यांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचे सिंग सांगत आहेत, असा सवाल पवार यांनी केला. सिंग यांच्या आरोपांमध्ये आता ताकद राहिली नाही. देशमुख मुंबईतच नव्हते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सिंग यांच्या पत्रात गृहमंत्री मला आणि मुख्यमंत्र्यांना फेबु्रवारीत भेटले असे लिहिले; मात्र आमची भेट मार्चच्या दुसर्या आठवड्यात झाली होती, असे सांगतानाच सिंग हे मार्चच्या दुसर्या आठवड्यापर्यंत गप्प का होते? ते आरोपासाठी महिनाभर का थांबले? असे सवाल त्यांनी केले. सिंग यांच्या बदलीची माहिती त्यांना मिळाल्यानंतर हे आरोप केले असावेत. मला त्यात पडायचे नाही, असे पवार म्हणाले. सिंग यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे चौकशीचा प्रश्नच येत नाही, तरीही चौकशी करावी, की करू नये हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याबाबत मी कालही बोललो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.इनफ इज इनफपवार यांनी कागदपत्रानिशी देशमुख हे पाच ते 27 फेबु्रवारीपर्यंत मुंबईत नव्हते, असे सांगितले असताना पत्रकारांनी तरीही देशमुख यांच्या पत्रकार परिषदेच्या व्हिडीओचा मुद्दा वारंवार उपस्थित केला. त्यामुळे पवार संतापले. इनफ इज इनफ म्हणत त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.फडणवीस तोंडघशीदिल्लीत पवार यांची पत्रकार परिषद चालू असताना देशमुख हे कोरोनाचे उपचार आणि गृहविलगीकरणात असल्याचे सांगत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेच देशमुख यांच्या 15 तारखेच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ टाकून काही प्रश्न उपस्थित केले; परंतु देशमुख रुग्णालयातून बाहेर पडत असताना पत्रकारांनी त्यांना गाठून काही प्रश्न विचारले होते, अशी माहिती पुढे आल्यानंतर फडणवीसांचा अति उत्साह त्यांना संकटात नेई, अशी स्थिती निर्माण झाली.