मध्य प्रदेश सरकारने अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. या अनाथ मुलांना मोफत शिक्षण देणार आहे.
मुंबई, दि. २३ मे : राज्यात कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक मुले डोक्यावरील मायेचे छत्र हरवल्याने अनाथ झाली आहेत. सध्या या मुलांचे भविष्य अंधारात आहे. त्याचे पुढे कसे होणार, असा प्रश्न आता समाजमनातून उपस्थित होत आहे. मध्य प्रदेश सरकारने अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. आता महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेते, हे पाहणे महत्वाचे आहे.राज्यात कोरोनामुळे आपले पालक गमावलेल्या मुलांची एकूण संख्या 195 आहे. त्यात दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची संख्या 108 आहे, तर एकच पालक गमावलेली मुले 87 आहेत. सगळ्यात जास्त अनाथ झालेल्या मुलांची संख्या नंदुरबार जिल्ह्यात आहे. नंदुरबार इथे 93 मुले अनाथ झाली आहेत. त्यातील 66 मुलांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत, तर 27 मुलांनी एकच पालक गमावले आहेत. हिंगोली 18, जालना 16, गोंदिया 12, ठाणे 11, नगर 8, नागपूर 7, परभणी 4, पुणे 4, धुळे 3, बुलडाणा 3, पालघर 2, रत्नागिरी 2, सिंधुदुर्ग 2, वाशीम 2 अशा मुलांनी आपल्या पालकांना गमावले आहे. या 195 पैकी 42 जणांची जबाबदारी राज्य सरकारने आधीच घेतली आहे.कोरोनाने अनाथ झालेल्या मुलांचा प्रश्न गंभीर झाल्याने राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली कृती गट नेमला आहे. हा कृती गट त्या त्या जिल्ह्यातील मुलांची जबाबदारी पाहणार आहे.दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. या अनाथ मुलांना मोफत शिक्षण देणार आहे. सोबतच प्रतिमहिना पाच हजार रुपयेही देणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार या मुलांसाठी काय करणार हा प्रश्न आहे.