कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना युरोपीय संघाने मंजुरी द्यावी.
नवी दिल्ली, दि. १ जुलै : युरोपमधील स्वित्झर्लंडसह सात देशांनी भारतात उत्पादित होणाऱ्या कोव्हिशिल्ड लशीला मान्यता दिल्यामुळे भारतीयांना आता युरोपचे दरवाजे उघडले आहेत. भारताच्या दणक्यानंतर अवघ्या 24 तासांत सात देशांनी कोव्हिशिल्डला मान्यता दिली आहे.युरोपमध्ये फिरण्यासाठी युरोपीयन संघाने ग्रीन पास नावाची कल्पना अंमलात आणली आहे. ज्यांनी मान्यताप्राप्त लसींचे डोस घेतले आहेत, त्यांनाच युरोपातील एका देशातून दुसऱ्या देशात फिरण्याची मुभा आहे. आता सातच देशांनी कोव्हिशिल्ड लसीला मान्यता दिल्यामुळे भारतीयांचा युरोपात फिरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताने लसींना मान्यता देण्याची रितसर मागणी केल्यानंतर एकाच दिवसात युरोपातील सात देशांनी कोव्हिशिल्ड लसीला मान्यता दिली आहे. यात स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आईसलंड, आयर्लंड आणि स्पेन या देशांचा समावेश आहे. गुरुवारी या सात देशांनी कोव्हिशिल्ड लशीचा ग्रीन पाससाठीच्या यादीत समावेश करून घेतला.युरोपात आतापर्यंत केवळ चारच लसींना मान्यता मिळाली आहे. यामध्ये फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि वॅक्सझेरविया यांचा समावेश आहे. अर्थात कोव्हिशिल्ड आणि वॅक्सझेरविया या दोन्ही लसी ॲस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्ड याच कंपनीनं तयार केल्या आहेत; मात्र वेगवेगळ्या देशात त्याची वेगवेगळी नावे ठेवण्यात आली आहेत. लसींच्या निर्मितीचं सूत्र आणि त्यातील फॉर्म्युला एकच असताना केवळ वेगळ्या नावामुळे कोव्हिशिल्डचा समावेश आतापर्यंत करण्यात आला नव्हता; मात्र भारताने विनंती केल्यानंतर 24 तासांतच ही औपचारिकता सात युरोपीय देशांनी पूर्ण केली.कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना युरोपीय संघाने मंजुरी द्यावी, अशी मागणी भारत सरकारच्या वतीने करण्यात आली. कोव्हिशिल्डला याअगोदरच जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळालेली आहे, तर कोव्हॅक्सिनला मान्यता मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे युरोपीय संघानेदेखील दोन्ही लसींना मान्यता देऊन भारतीयांचा युरोपात फिरण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी भारत सरकारकडून करण्यात आली होती. सध्या तरी केवळ सातच देशांनी याला प्रतिसाद देत केवळ कोव्हिशिल्डला मान्यता दिली आहे.