IMG-LOGO
राष्ट्रीय

COVID19 : कैद्यांना सोडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Sunday, May 09
IMG

चार लाख कैदी सध्या तुरुंगात असून त्यांनाही जगण्याचा व आरोग्याचा अधिकार आहे.

नवी दिल्ली, दि. ९  मे : देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसा दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २४ देशात ४ हजार ९२ करोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. दरम्यान, चार लाख कैदी सध्या तुरुंगात असून त्यांनाही जगण्याचा व आरोग्याचा अधिकार आहे असे सांगून सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी म्हटले आहे, की गेल्यावर्षी मार्चमध्ये ज्यांना राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या उच्चस्तरीय समित्यांनी जामीन मंजूर केला आहे त्यांची, कुठलाही फेरविचार न करता तुरुंगातून सुटका करण्यात यावी. त्यात विलंब करता कामा नये.गेल्या वर्षी कोर्टाने सर्व कैद्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अनेक कैद्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर सोडण्यात आलेले सर्व कैदी परत तुरुंगात आले आहेत. अनेक तुरुंगामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी भरलेले आहेत. त्यामुळे कैदी आणि कर्मचारीही संक्रमित होत आहेत. त्याची दखल चीफ जस्टीस एन. व्ही. रमना यांनी घेत हे आदेश जारी केले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या संकेतस्थळावर कैद्यांना सोडण्याचे आदेश अपलोड केले आहेत. राज्यांनी स्थापन केलेल्या उच्च स्तरीय समित्यांनी गेल्या वर्षी देण्यात आलेल्या निर्देशाचं पालन करावं. ज्या कैद्यांना गेल्या वर्षी सोडण्यात आले. त्यांना पुन्हा सोडण्यात यावे. ज्या कैद्यांना गेल्यावर्षी पॅरोल मिळाली होती, त्यांना पुन्हा 90 दिवसात सोडण्यात यावे. तसेच अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणातच आरोपींना अटक करण्यात यावी, असं कोर्टाने आदेशात म्हटलं आहे.

Share: