सगळ्याचा वापर करून काही प्रकरणांचे निकालही सुनावले. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.
गांधीनगर, दि. २१ : गुजरातमधील गांधीनगर इथं एका भामट्यानं बोगस कोर्ट सुरू करून अनेक वर्षे ते चालवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कोर्टात आरोपी स्वत: न्यायाधीश झाला होता आणि बनावट वकीलही नेमले होते. इतकंच नाही, त्यानं या सगळ्याचा वापर करून काही प्रकरणांचे निकालही सुनावले. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. मॉरिस सॅम्युअल ख्रिश्चन असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदेशीर वाद मिटवण्यासाठी सक्षम न्यायालयानं मध्यस्थ नेमल्याचा दावा करून मॉरिस हा उद्योग करत होता. २०१९ मध्ये सरकारी जमिनीशी संबंधित एका प्रकरणात त्यानं आदेश दिला आणि तिथंच तो फसला. हे बनावट न्यायालय गेल्या पाच वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा अदांज आहे. मॉरिस सॅम्युअल ख्रिश्चन याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १७० आणि ४१९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मॉरिसवर न्यायाधीश असल्याचं भासवून हवे ते आदेश देऊन लोकांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला आहे.