भारतीय शेतकरी संघटनेचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत शनिवारी बंगालमध्ये दाखल झाले. कोलकात्याच्या भवानीपोरा येथे आयोजित किसान महापंचायतीत ते सामील झाले.
कोलकाता, दि. १३ मार्च : बंगालच्या राजकीय पेचप्रसंगात शेतकरी आंदोलक दाखल झाले असून, त्यांनी भाजपविरोधात प्रचार सुरू केला आहे. ट्रॅक्टर रॅली काढून त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपविरोधात रान उठवले आहे.भारतीय शेतकरी संघटनेचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत शनिवारी बंगालमध्ये दाखल झाले. कोलकात्याच्या भवानीपोरा येथे आयोजित किसान महापंचायतीत ते सामील झाले. या दरम्यान टिकैत म्हणाले, की तुम्ही दुसर्या कोणत्याही पक्षाला मत दिले चालेल; परंतु तुम्ही भाजपला मतदान करू नका. आम्ही येथे क्रांतिकारकांच्या भूमीत आपला लढा पुढे नेण्यासाठी आलो आहोत. केंद्र सरकार तीनही कृषी कायदे परत घेत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. संपूर्ण केंद्र सरकार दिल्ली सोडून बंगालमध्ये प्रचारामध्ये व्यस्त आहे. म्हणूनच आमचे सर्व नेतेही येथे पोहोचले आहेत. सरकार शेतकर्यांशी बोलत नाही. आम्ही आणखी आठ महिने आंदोलन चालवण्यास तयार आहोत. जोपर्यंत सरकार कायदे परत घेत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहिल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जिथे जातील, तिथे तिथे आम्ही त्यांच्या मागे जाऊ, असे टिकैत यांनी सांगितले. रविवारी (14 मार्च) टिकैत सिंगूर आणि आसनसोल येथे शेतकरी महापंचायती घेतील. संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम )ही केंद्र सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. एसकेएमच्या नेत्यांनी सांगितले, की आम्ही बंगालच्या शेतक-यांना भाजपला मतदान करू नका, असे आवाहन केले आहे. निवडणुकीत भाजपचा पराभव केला, तर त्यांना शेतकरी कायदे मागे घ्यावे लागतील. भाजपला धडा शिकविणे हे आमचे उद्दीष्ट आहे, असे योगेंद्र यादव म्हणाले. आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देत नाही किंवा लोकांना कोणत्याही पक्षाला मतदान करण्यास सांगत नाही. भाजपला धडा शिकविणे हे आमचे उद्दीष्ट आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर म्हणाल्या, की सरकार काही कॉर्पोरेट्सना देश विकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी लोकांना सावधपणे त्यांचा मताधिकार वापरावा असे आवाहन केले. शेतक-यांचा अपमान केल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेध करत पाटकर यांनी बंगाल विधानसभेत कृषी कायद्याविरोधात पारित केलेल्या ठरावाचे स्वागत केले. 26 नोव्हेंबरपासून अनेक शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली सीमेवरील आंदोलन सुरू ठेवले आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यात अनेक फे-या झाल्या आहेत, पण या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. आता किसान मोर्चाने निवडणुकांमध्ये भाजपविरोधात जनतेला आवाहन करण्याचा निर्णय घेतला आहे.