आम्ही आता अहिंसेच्या मार्गावर चालणार नाही हे सरकारने लक्षात असू द्यावं असं शेतकरी संघटनांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली, दि. ५ डिसेंबर : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर जवळपास आठवड्याभरापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आज शेतकरी प्रतिनिधीमंडळ आणि केंद्रीय मंत्री यांच्यात पुन्हा एकदा चर्चा झाली. आज (शनिवारी) या आंदोलनाचा दहावा दिवस आहे. मात्र नवव्या दिवशीही ही चर्चा निष्फळ ठरली आहे. चर्चेची पुढची फेरी ९ डिसेंबरला होणार आहे. आतापर्यंत खूप चर्चा झाली. आम्हाला आता सरकारसोबत कोणतीही बैठक नको, लेखी स्वरुपात उत्तर हवंय.', अशी भूमिका शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी घेतली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात गेल्या तीन तासांपासून अधिक काळ सुरू असलेल्या या बैठकीत केंद्र सरकारकडून कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल, तर शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकरी संघटनांचे एकूण ४० प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकरी एका पानावर हो किंवा नाही लिहून बसले होते. शेतकरी नेत्यांनी सरकारला सांगितलं की, 'आमच्याकडे १ वर्ष पुरेल इतकं धान्य आम्ही सोबत घेऊन आलो आहोत. आता काय करायचं, याचा निर्णय सरकारने घ्यावा.' दरम्यान, केंद्र सरकारसोबतच्या या बैठकीआधीच शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत येत्या ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद'ची घोषणा केलेली आहे.कृषी कायद्यांचा शेतकऱ्यांना नाही तर फक्त केंद्र सरकारला फायदा होणार आहे. आम्हाला कॉर्पोरेट फार्मिंग करायचं नाही. त्यामुळे हे कायदे रद्द करावेत अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. आमच्या मागण्यांसाठी सध्या आम्ही रस्त्यावर राहतो आहोत. जर सरकारला हे चालत असेल तर आमची काही हरकत नाही. मात्र आम्ही आता अहिंसेच्या मार्गावर चालणार नाही हे सरकारने लक्षात असू द्यावं असं शेतकरी संघटनांनी म्हटलं आहे.