सुपौलच्या राघोपूर स्टेशन हद्दीत येणार्या गद्दी गावात ही घटना घडली. गावात राहणार्या मिश्री लाल साह यांच्या घरातून दुर्गंध येत असल्याची तक्रार गावकर्यांनी सरपंचांकडे केली.
पाटणा, दि. १३ मार्च : काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या बुराडी प्रकरणाने अनेकांना धक्का बसला होता. आता बिहारच्या सुपौल भागातही असेच एक प्रकरण समोर आले आहे. सुपौलमध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्यांनी फाशी लावून जीवन संपवले. त्यात पती-पत्नीसहीत त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सुपौलच्या राघोपूर स्टेशन हद्दीत येणार्या गद्दी गावात ही घटना घडली. गावात राहणार्या मिश्री लाल साह यांच्या घरातून दुर्गंध येत असल्याची तक्रार गावकर्यांनी सरपंचांकडे केली. त्यानंतर गावकर्यांनी रात्री वाजण्याच्या दरम्यान मिश्री लाल यांच्या घराची खिडकी उघडली, तेव्हा अनेकांचे डोळे पांढरेफटक पडले. आतून बंद केलेल्या घरात कुटुंबातील सर्वच सदस्य एका रांगेत फाशीला लोंबकळलेल्या अवस्थेत ग्रामस्थांच्या नजरेस पडले. ग्रामस्थांनी याची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. मृत कुटुंबाची गावातल्या कोणाशीही शत्रूत्व नव्हते, की भांडणतंटा नव्हता. मिश्री लाल यांच्याकडे आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी रोजगाराचे काहीही साधन नव्हते. ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबाने हे धक्कादायक पाऊल उचलले असण्याची शक्यता गावकर्यांनी व्यक्त केली. मिश्री लाल यांनी व्यवसायाचा प्रयत्न केला होता; परंतु यात त्यांच्या पदरी अपयशच पडले. त्यानंतर ते कोळसा खरेदी-विक्रीचे काम करत होते. कुटुंबात कुणीही जास्त शिकलेले नव्हते. मुलाचे शिक्षण सुरू होते. मुलींचे शिक्षण अर्ध्यावरच थांबले होते. या कुटुंबाने पाच-सहा दिवसांपूर्वीच आपले जीवन संपवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांत मिश्री लाल, त्यांची पत्नी, दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.