लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले.
मुंबई, दि. १२ : अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. मुंबईतील वांद्र पूर्व परिसरातील खेरनगरमधील राम मंदिर परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर बाबा सिद्दीकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले.बाबा सिद्दीकी यांचा मुलगा व वांदे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर ही घटना घडल्याची माहिती आहे. तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. बाबा सिद्दिकी हे राज्याचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसला रामराम करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. तर त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व या मतदारसंघाचे आमदार आहेत.बाबा सिद्दिकी यांना १५दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याची तक्रार त्यांनी पोलिसात केल्यानंतर बाबा सिद्दिकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासोबत एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात असायचा. मात्र तरीही आज घात झाला. ३ ते ४ राऊंड फायर झाले. त्यातील एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली. तीन पैकी दोन हल्लेखोरांनी पोलिसांनी पकडल्याचे सांगण्यात येत आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता खेरवाडी जंक्शनच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरात तणावाची परिस्थिती आहे.