IMG-LOGO
COVID-19

गुजरातमध्ये मृत्यूंची लपवाछपवी?

Friday, May 14
IMG

गुजरातमधील महत्त्वाच्या पाच शहरांमध्ये 45 हजार 211 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

कोरोनामुळे दाखविले फक्त चार हजार मृत्यू; सव्वा लाख मृत्यू कशामुळे?अहमदाबाद, दि. १४  मे :  कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत गुजरातच्या आरोग्य व्यवस्थेची दाणादाण उडाल्यासारखीच परिस्थिती आहे. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारने सारवासारव केली. गुजरातमध्ये दिवसाला एक हजार 744 लोकांचा मृत्यू होत असून, 71 दिवसांत एक लाख 23 हजारांहून अधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून इतके मृत्यूप्रमाणपत्र वाटण्यात आले असले, तरी राज्यात चार हजार 218 मृत्यू झाले असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सरकार ही लपवाछपवी चर्चेचा विषय झाली आहे.एक मार्च ते 10 मे या कालावधीत राज्यात वाटप करण्यात आलेल्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आकडेवारीची एका गुजराती दैनिकाने पडताळणी केली. यातून डोळे विस्फारुन टाकणारी माहिती उजेडात आली आहे. 33 जिल्हे आणि आठ महापालिकांद्वारे 71 दिवसांमध्ये एक लाख 23 हजार 871 मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. विरोधाभास म्हणजे राज्यात केवळ चार हजार 218 जणांचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. त्यामुळे गुजरातमध्ये 71 दिवसात सव्वा लाख लोकांचा मृत्यू कशामुळे झाला, असा प्रश्‍न आता उभा राहिला आहे. मृत्यू प्रमाणपत्रांची तुलना केली, तर या वर्षी मार्च महिन्यात राज्यात 26 हजार 26, एप्रिलमध्ये 57 हजार 796 आणि मे महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसात 40 हजार 51 मृत्यू झाले आहेत. 2020 मधील आकडेवारीशी याची तुलना केली असता मार्च 2020 मध्ये 23 हजार 352, एप्रिलमध्ये 21 हजार 591 आणि मे महिन्यात 13 हजार 125 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. यातून हेच दिसून आहे, की गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मृत्यूंची संख्या दुप्पट झाली आहे. गुजरातमधील महत्त्वाच्या पाच शहरांमध्ये 45 हजार 211 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. 71 दिवसांच्या कालावधीत या शहरांमध्ये 45 हजार मृत्यूप्रमाण दिली गेली. यात अहमदाबादमध्ये 13 हजार 593 मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ सुरतमध्ये 8 हजार 851, राजकोट दहा हजार 887, वडोदरा सात हजार 722 मृत्यू प्रमाणपत्रे दिली गेली. अहमदाबाद, सुरत, राजकोट, भावनगर, जामनगर या जिल्ह्यांमध्ये गुजरातमधील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. या शहरांच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी रांगा लागल्या आहेत. मृतांची संख्या वाढली असताना सरकारी खात्यांनी दिलेल्या आकडेवारीने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.पाच महानगरांमध्यील मृत्यू दाखल्यांची आकडेवारीशहर                    कोरोनाने मृत्यू                 मृत्यू दाखलेअहमदाबाद               2,126                        13,593सुरत                     1,074                         8,851राजकोट                    288                        10,887वडोदरा                     189                          7,722भावनगर                 134                                  4158मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरणसरकार आकडे लपवत नाही तर अन्य व्याधींनी झालेल्या मृतांची नोंद कोरोनामध्ये समाविष्ट केली जात नाही, असे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या वाक्याचा सोपा अर्थ म्हणजे, जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल आणि तो डायबिटीज म्हणजे मधुमेह, हृदयरोग किंवा किडनी अशा आजारांशी त्रस्त असेल, तर त्याच्या मृत्यूची नोंद कोरोनामुळे झाल्याचे म्हटले जाणार नाही.

Share: