मुलीचा मृतदेह घरी नेऊन, विधीवत तिचे अंत्यसंस्कार करता यावे, म्हणून पीडितेचे कुटुंब पोलिसांकडे विनवणी करत होते. आपल्या मुलीला शेवटचे डोळे भरून पाहता यावे, तिचा मृतदेह 15 मिनिटे तरी घरी नेण्यात यावा, अशी मागणी कुटुंब करत होते.
लखनऊ, ३० सप्टेंबर : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करत, बोलता येऊ नये म्हणून तिची जीभदेखील कापून टाकली. उपचार दरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. पीडितेचा मृतदेह तिच्या गावी आणून, उत्तर प्रदेश पोलिसांनी गुपचूप या मुलीचे अंत्यसंस्कार उरकल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आला आहे. विनवणी करूनही पोलिसांनी मुलीचे अंत्यदर्शन करू न दिल्याने, कुटुंबियांनी आक्रोश केला आहे आपल्या मुलीचा मृतदेह घरी नेऊन, विधीवत तिचे अंत्यसंस्कार करता यावे, म्हणून पीडितेचे कुटुंब पोलिसांकडे विनवणी करत होते. आपल्या मुलीला शेवटचे डोळे भरून पाहता यावे, तिचा मृतदेह 15 मिनिटे तरी घरी नेण्यात यावा, अशी मागणी कुटुंब करत होते. मात्र, या सगळ्याला नकार देत, तब्बल 200 पोलिसांच्या ताफ्यासह तिचा मृतदेह थेट स्मशानभूमीत नेण्यात आला. कुटुंबाची कुठलीही मागणी मान्य न करता, मध्यरात्री 2.30च्या दरम्यान, पोलिसांनी जबरदस्ती मुलीचे अंत्यसंस्कार उरकले. यावेळी 200 पोलिस तिच्या चितेभोवती घेरा करून उभे होते. अंत्यसंस्काराच्या वेळीही तिच्या कुटुंबियांना स्मशानभूमीत येण्यास मज्जाव करण्यात आला.