IMG-LOGO
राष्ट्रीय

अति संक्रमित जिल्ह्यात सहा आठवड्यांची टाळेबंदी आवश्यक

Thursday, May 13
IMG

तरुण वर्ग जास्त प्रवास करत असल्याने त्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

नवी दिल्ली, दि. १३  मे :  कोरोना संक्रमणाचा दर दहा टक्क्यांपेक्षा जास्त असणार्‍या सर्व जिल्ह्यांमध्ये सहा ते आठ आठवड्यांची  टाळेबंदी आवश्यक आहे, असा सल्ला आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिला आहे. देशात कोरोना संक्रमणाचे प्रमाण 21 टक्के आहे. 734 पैकी 310 जिल्ह्यांमध्ये हा दर बरोबर किंवा त्याहून अधिक आहे. तरुण वर्गातील आकडेवारी सर्वात जास्त आहे, याबाबत विचारले असता डॉ. भार्गव म्हणाले, की कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेची आकडेवारी पाहिल्यास असे दिसून येते, की वयामध्ये फारसा फरक नसल्याचे दिसून येते. 40 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक कोरोनाला लवकर बळी पडतात. तरुण वर्ग जास्त प्रवास करत असल्याने त्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेस भारत तोंड देत आहे. दररोज जवळपास साडेतीन लाख प्रकरणे नोंदवली जात आहेत.कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आणि मृत्युमुखी पडणार्‍यांच्या संख्येत घट होत असल्याचे मंगळवारी सरकारने स्पष्ट केले. कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, ओडिशा आणि पंजाब ही राज्ये त्या 16 राज्यांपैकी आहेत, ज्यांमध्ये दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील रुग्णसंख्येत दररोज घट होत चालल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.

Share: