राज्यातील ४५ हजारांहून अधिक खासगी डॉक्टर त्यात सहभागी होतील, असे 'आयएमए'ने म्हटले आहे.
मुंबई, दि. ११ डिसेंबर : इंडियन मेडिकल असोसिएशन'ने आज, शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारला आहे. राज्यातील ४५ हजारांहून अधिक खासगी डॉक्टर त्यात सहभागी होतील, असे 'आयएमए'ने म्हटले आहे. केंद्र सरकारने आयुर्वेदाच्या डॉक्टरांना ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास दिलेली परवानगी मागे घेण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील सर्व खासगी दवाखाने, रुग्णालयातील बाह्य़रुग्णसेवा सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात येतील. आपत्कालीन सेवा मात्र सुरू राहतील, असे 'आयएमए'ने स्पष्ट केले आहे. राज्यातील 'आयएमए'च्या २१९ शाखांमधील ४५ हजारांहून अधिक डॉक्टरांसह महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी केलेले एक लाख दहा हजार डॉक्टर बंदमध्ये सहभागी होतील. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने अशी सरमिसळ करण्यासाठी तयार केलेल्या ४ समित्या त्वरित रद्द केल्या पाहिजेत. वैद्यकीय शाखांची सरमिसळ करण्याऐवजी प्रत्येक शाखेचा वेगळा विकास करून जनतेला त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल यावर सरकारने भर द्यावा आदी मागण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे.