IMG-LOGO
राष्ट्रीय

जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४ जवान शहीद

Tuesday, Jul 16
IMG

या संघर्षात लष्कराचे जवान शहीद झाले, तर काहींना गंभीर इजा झाल्याचं वृत्त समोर आलं.

उरारबागी, दि.१६  :  जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. आता जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले आहेत.सोमवारी सायंकाळी जम्मूच्या संभागमधील डोडा जिल्ह्यातील धारी घोटच्या उरारबागी भागामध्ये सोमवारी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरु झाला. यामध्ये लष्कराचे काही जवान गंभीररित्या जखमी झाल्याचंही म्हटलं गेलं. सदर घटनेनंतर जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्करानं तातडीनं जबाबदारी हाती घेत जखमींना रुग्णालयात पाठवत या भागाला छावणीचं स्वरुप दिलं. डोडा महामार्गापासून नजीकरच्या सर्व परिसरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागामधील प्रत्येक लहानमोठ्या हालचालीवर सुरक्षा दलाकडून करडी नजर ठेवली जात आहे. इथून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणीसुद्धा केली जात आहे.  डोडा जिल्ह्यातील उरारबागीमध्ये असणाऱ्या घनदाट वनक्षेत्रामध्ये अद्यापही हे दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती लष्कराला मिळाल्यामुळं या भागात सध्या शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. इथं सीआरपीएफचीसुद्धा मदत घेतली जात असून, सुरुवातीला मिळालेल्या माहितीच्या आधारे इथं लष्कराची कारवाई सुरू असतानाच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ज्यानंतर लष्करानंही प्रतिहल्ला चढवला. या संघर्षात लष्कराचे जवान शहीद झाले, तर काहींना गंभीर इजा झाल्याचं वृत्त समोर आलं. 

Share: