देशभरातील ८ राज्यांमधल्या ५७ जागांसाठी शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यात मतदान होत आहे.
दिल्ली, दि. १ : गेल्या दीड महिन्यापासून देशभरात विविध राज्यांत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आज देशभरातील ८ राज्यांमधल्या ५७ जागांसाठी शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यात मतदान होत आहे. एकीकडे पहिल्या सहा टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी फारशी वाढली नसल्याचं दिसून आलं असताना दुसरीकडे शेवटच्या टप्प्यात काय घडणार? याची उत्सुकता मतदारांना आहे. एकूण ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. बसपाने सर्वाधिक ५६ उमेदवार उभे केले आहेत, त्यापाठोपाठ भाजपने ५१ आणि काँग्रेसने ३१ उमेदवार उभे केले आहेत. संपूर्ण पंजाबमधील मतदानासह, राज्यात या टप्प्यात सर्वाधिक ३२८ उमेदवार आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेशातील १३ जागांसाठी १४४ उमेदवार आहेत. बिहारमध्ये ८ जागांसाठी १३४, तर पश्चिम बंगालमध्ये ९ जागांसाठी १२४ उमेदवार आहेत. अखेरच्या टप्प्यात पंजाबमधील सर्व १३, हिमाचल प्रदेशातील सर्व चार, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील नऊ, बिहारमधील आठ, ओडिशातील सहा, झारखंड व चंदीगडमधील प्रत्येकी तीन जागांवर मतदान होणार आहे. ओडिशाच्या उर्वरित ४२ विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान होणार असून हिमाचल प्रदेशातील सहा विधानसभा जागांसाठीही पोटनिवडणूक होणार आहे.