IMG-LOGO
COVID-19

तीन आठवड्यांच्या टाळेबंदीबाबत उद्या निर्णय?

Friday, Apr 09
IMG

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्ण संख्येप्रमाणेच कोरोना बळींची संख्याही वाढत आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलविली सर्वपक्षीय बैठक; कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरही चर्चामुंबई, दि. ९ एप्रिल : राज्यात टाळेबंदीला विरोधी पक्षांचा आणि व्यापार्‍यांचा विरोध असला, तरी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यात तीन आठवड्यांची कडक टाळेबंदी करण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची उद्या दुपारी बैठक बोलविली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्ण संख्येप्रमाणेच कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. राज्यातील अनेक स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी जागाच मिळत नाही. काही ठिकाणी मृतदेहांचे सामूहिक दहन केले जात आहे. शिवाय राज्यात कोरोना लसींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून राज्यभर अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांनी ही बैठक बोलावली असून त्यात तीन आठवड्यांची टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्राकडून पुरेसी लस येईपर्यंत राज्यात टाळेबंदी करण्याची सरकारची मानसिकता असून, त्यासाठीही विरोधकांची मते जाणून घेण्यात येणार आहेत. राज्यातील वीकएंड लॉकडाऊनला व्यापार्‍यांनी विरोध केला आहे. व्यापार्‍यांनी राज्यभर आंदोलने सुरू केली आहेत. सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा इशाराही दिला आहे. व्यापार्‍यांना राजकीय पक्षांकडूनही बळ मिळत असल्याने सर्वंच राजकीय पक्षांना वस्तुस्थितीची माहिती करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही सर्वपक्षीय बैठक आयोजित केली असावी. राज्यात कोरोना लसीच्या पुरवठयावरून केंद्र विरुद्ध राज्य असे राजकारण रंगले आहे. कोरोनाची महामारी असताना राजकारण न करता समन्वयाने या संकटाचा सामना करता यावा, म्हणूनही मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे. कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर आहे. या नव्या स्ट्रेनमुळे एका व्यक्तीपासून अनेक लोक बाधित होत आहेत. कोरोनाची साखळी तोडायची असेल, तर किमान तीन आठवड्यांची कडक टाळेबंदी करण्याची गरज आहे. टाळेबंदी कशी अपरिहार्य आहे, हे विरोधकांना समजावून सांगण्यासाठी आणि कोरोनावर नियंत्रण कसे आणता येईल? विरोधी पक्षांच्या याबाबत काय सूचना आहेत? हे जाणून घेण्यासाठीही ही बैठक महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या जी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, त्या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत. विजय वडेट्टीवारांचे संकेतराज्यातील सध्याची रुग्णसंख्या ही पाच लाख आहे. पुढच्या काही दिवसात ही संख्या दहा लाखांवर गेली, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे टाळेबंदीबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षांचे मत घेतले जाईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Share: