उद्या होणाऱ्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नियमावली पाठवण्यात आली आहे. नियमावली पाठवताना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना भारत बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगितले आहे.
नवी दिल्ली, दि. ७ डिसेंबर : नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंद दरम्यान ८ तारखेला भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिले आहे.केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी 'भारत बंद' पुकारला आहे. या 'भारत बंद'ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. तर कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.उद्या होणाऱ्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नियमावली पाठवण्यात आली आहे. नियमावली पाठवताना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना भारत बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगितले आहे. याव्यतिरिक्त, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासकांनी कोविड -19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. सोशल डिस्टन्स राहिल याची काळजी घेतली पाहिजे असं बजावण्यात आलं आहे.