अंदमान बेटांजवळच्या सागरी भागावर हा तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, दि. १९ मे : भारताच्या पश्चिम किनारपट्टीला नुकताच तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे. तेवढ्यातच आता भारतीय नागरिकांना दिलासा देणारी गोष्ट समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुढील तीन दिवसांत म्हणजेच 21 मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे. याशिवाय यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र तयार होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.नैऋत्य मोसमी वार्यांना भारतीय उपखंडात मॉन्सून म्हटले जाते. भारतीय हवामान विभागाने हे वारे एक जूनला केरळमध्येे दाखल होतील, असा अंदाज वर्तवला आहे. सध्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 जुलैला नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मॉन्सून दाखल होईल. दहा जूनपर्यंत मॉन्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मॉन्सून लांबणीवर पडला होता; मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मॉन्सून वेळेवर दाखल झाला, तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्याभरात अवकाळी पाऊस, गारपीट, पूर्वमोसमी पावसाचा फटका बसलेला आहे. शेतकर्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीट झाली. पूर्वमोसमी पावसामुळे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील नदीला पूर आला.’स्कायमेट’च्या मॉन्सूनच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पाच टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर ’स्कायमेट’चा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये हवामानात होत असलेल्या बदलांमुळे परिस्थिती आधी वादळ आणि त्यात तीव्र बदल झाल्यास त्याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याचीही शक्यता आहे. विशेषत: अंदमान बेटांजवळच्या सागरी भागावर हा तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.