उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारलाही फटकारले आहे. जिल्ह्यांना योग्य पद्धतीने रेमडेसिवीरचे वाटप होत नाही.
महाराष्ट्राला फटकारले; रेमडेसिवीरचा पुरवठा रुग्णसंख्येनुसार व्हावामुंबई, दि. १९ एप्रिल : महाराष्ट्रातील रेमडेसिवीरच्या तुटवड्यासंदर्भात आता मुंबई उच्च न्यायालयानेही दखल घेतली आहे. यासंदर्भात न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने, राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन कोणत्या आधारे वाटले जात आहे, असा सवाल केंद्र सरकारला केला आहे. तसेच, एकट्या महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत 40टक्क्यांहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे त्यांना रेमडेसिवीरदेखाल त्याच प्रमाणात मिळायला हवे, असे न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारलाही फटकारले आहे. जिल्ह्यांना योग्य पद्धतीने रेमडेसिवीरचे वाटप होत नाही, असे म्हणत, राज्य सरकारने 13 एप्रिल आणि 18 एप्रिलला नागपुरात रेमडेसिवीरची एकही कुपी का पाठवली नाही, असा सवालही केला आहे. न्यायालयाने म्हटले आहे, की आम्ही अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संचालकांसोबत बैठक घेतली. त्यांनी सांगितले, की राज्य पातळीवर एक समिती आहे. ही समिती राज्यांसाठी कुप्यांची संख्या निश्चित करते. सध्या सात कंपन्या देशात रेमेडेसिविर औषधाचा पुरवठा करत आहे. परिस्थिती पाहता, जेथे कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा शहरांना कंपन्यांनी अधिक रेमडेसिवीर द्यायला हव्या. यात नागपूरचाही समावेश आहे. यासाठी सरकार कंपन्यांना निर्देश देऊ शकते. महाराष्ट्रात दर तासाला जवळपास दोन हजार 859 जणांना कोरोनाची लागण होत आहे. प्रत्येक तीन मिनिटांना एकाचा मृत्यू होत आहे. एवढेच नाही, तर राज्यातील एकूण मृतांचा आकडाही 60 हजारांच्या वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत येथे 503 जणांचा मृत्यू झाला.