उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले.
बारामती, दि. ३१ : बारामती लोकसभा जागेवर पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढणार आहेत.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा दिवस असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आज महायुतीच्या माध्यमातून मला बारातमती मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. या उमेदवारीसाठी सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्यातील महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या वाट्याला आलेली परभणीची मतदारसंघाची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना सोडली आहे. शिरूरमध्ये शिवसेनेमधून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शिवाजी आढळराव पाटील लोकसभेची निवडणूक लढवतील, तर रायगडमधून विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचं नाव आधीच जाहीर करण्यात आलं आहे. सध्या तरी अजित पवार यांनी तीनच जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे.