IMG-LOGO
राष्ट्रीय

उच्च न्यायालयाचा लव जिहादला झटका

Saturday, Jan 09
IMG

उत्तर प्रदेशात आंतरधर्मीय लग्नानंतर जबरदस्ती धर्मपरिवर्तन केल्यास तब्बल दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आहे.

अलाहाबाद, दि. ९ जानेवारी  : उत्तर प्रदेशात लागू करण्यात आलेल्या लव जिहाद कायद्याला अलाहाबाद उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. कुठल्याही सज्ञान दाम्पत्याला त्याच्या मर्जीने एकत्र राहण्याचा अधिकार आहे, त्यांच्या आयुष्यात कुणीही दखल देऊ नये, असे न्यायालयाने बजावले आहे.22 वर्षीय तरुणीच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे. शाहिस्ता परवीन, उर्फ संगीता असे या तरुणीचे नाव असून तिने एका मुस्लिम तरुणाशी विवाह केला. शिवाय, तिने स्वेच्छेने मुस्लीम धर्म स्वीकारला. या प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांकडून दोघांच्याही जीविताला धोका असल्याचे तरुणीचे म्हणणे आहे. आणि याचप्रकरणी तिने न्यायालयाकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली होती.न्यायमूर्ती सरल श्रीवास्तव यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या वेळी न्यायमूर्ती श्रीवास्तव म्हणाले, की न्यायालयानं वारंवार हे सांगितले आहे, की हे दोघे सज्ञान आहेत आणि त्यांनी स्वेच्छेने सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या सुखी आयुष्यात कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. हे सांगतानाच न्यायमूर्ती श्रीवास्तव यांनी या दाम्पत्याला सुरक्षा पुरवण्याचेही आदेश दिले. उत्तर प्रदेशात आंतरधर्मीय लग्नानंतर जबरदस्ती धर्मपरिवर्तन केल्यास तब्बल दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आहे. शिवाय 50 हजारांपर्यंतचा दंडही भरावा लागू शकतो. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर हा कायदा करण्यात आला. याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांमध्ये हा कायदा संविधानविरोधी असून यातून विशिष्ट समाजाला लक्ष्य केले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. लग्नानंतर धर्मपरिवर्तन केल्यास कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते, त्यामुळे हा कायदा आणला गेल्याचे योगी सरकारचे म्हणणे आहे. हा कायदा संविधानाच्या अधिन राहून करण्यात आल्याचा दावाही न्यायालयात करण्यात आला आहे. या कायद्यामुळे कुणाच्याही हक्कांवर गदा येणार नाही, केवळ फसवून धर्मांतरण करणा-यांना चाप लावण्यासाठी कायद्याचा आधार घेतला गेल्याचे योगी सरकारने म्हटले आहे.योगी सरकारला चापअलाहाबाद उच्च न्यायलयाच्या या निर्णयामुळे योगी सरकारच्या लव जिहादविरोधी कायद्याला चांगलाच झटका बसला आहे. कारण, कुणीही सज्ञान दाम्पत्य सोबत राहु शकते, लग्न करू शकते. स्वच्छेने धर्मांतरही करू शकते. त्यांच्या आयुष्यात कुणीही डोकावू नये, असा इशाराच न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे लव जिहादवरुन रान पेटवणा-या योगी सरकारला चाप लागण्यास मदत होणार आहे.

Share: