पश्चिम बंगालमध्ये आपली लढाई तृणमूल काँग्रेसबरोबर आहे; मात्र आपल्याला त्यांच्या छुप्या मित्रांपासूनदेखील सावध राहावे लागणार आहे. डावे, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस हे पडद्यामागे मॅच फिक्सिंग करण्यात गुंतले आहेत.
कोलकात्ता, दि. ७ फेब्रुवारी : पश्चिम बंगाल हे फुटबॉलवर प्रेम करणारे राज्य आहे. त्यामुळेच मी फुटबॉलच्या भाषेत सांगू इच्छतो, तृणमूल काँग्रेसने एका पाठोपाठ एक असे कित्येक ‘फाउल’ केलेले आहेत. गैरप्रशासन, विरोधकांवर हल्ला व हिंसाचाराचा फाउल. पश्चिम बंगालच्या लोकांचा पैसा लुटण्याचा फाउल व श्रद्धेवर होत असलेल्या हल्ल्यांचा फाउल. पश्चिम बंगालची जनता सर्वकाही पाहत आहे. त्यामुळे आता लवकरच पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसला राम कार्ड दाखवणार आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करीत पश्चिम बंगालमध्ये सत्तातंर होण्याचा विश्वास व्यक्त केला. हल्दिया येथील एका सभेत बोलताना मोदी यांनी उत्तराखंडमध्ये आलेल्या जलप्रलयाबाबतची माहिती लोकांना दिली. उत्तराखंडसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले त्यानंतर तृणमूल काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधताना मोदी म्हणाले, की पश्चिम बंगालची आज जी परिस्थिती आहे, त्याचे सर्वात मोठे कारण येथील राजकारण आहे. येथे विकासाचे राजकारण झाले नाही. पहिले काँग्रेसने राज्य केले, तर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार समोर आला. डाव्यांच्या शासनकाळात भ्रष्टाचार व अत्याचार दिसून आला आणि विकास ठप्प झाला. त्यानंतर ममता यांनी परिवर्तनाचे वचन दिले, लोकांनी विश्वास ठेवला; मात्र दहा वर्षांच्या शासनकाळात हे स्पष्ट झाले, की हे परिवर्तन नव्हते तर डाव्यांचे पुनर्जीवन आहे. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये गरीबीचे प्रमाण वाढत गेले, उद्योगधंदे बंद होत गेले. पश्चिम बंगालमध्ये आपली लढाई तृणमूल काँग्रेसबरोबर आहे; मात्र आपल्याला त्यांच्या छुप्या मित्रांपासूनदेखील सावध राहावे लागणार आहे. डावे, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस हे पडद्यामागे मॅच फिक्सिंग करण्यात गुंतले आहेत. दिल्लीत भेटून ते राजकारणावर चर्चा करतात. केरळमध्ये काँग्रेस व डाव्यांनी मिळून पाच वर्षे राज्याला लुटण्याचा करार केला आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसबरोबरच काँग्रेस व डाव्या पक्षांवरदेखील या वेळी निशाणा साधला.