IMG-LOGO
राष्ट्रीय

पाकिस्तानी महिला उत्तर प्रदेशात सरपंच!

Thursday, Dec 31
IMG

पाकिस्तानात राहणारी 64 वर्षीय बानो बेगम35 वर्षांपूर्वी एटा येथील एका गावात तिच्या नातेवाइकांकडे आली होती. त्यानंतर तिने तिथला तरुण अख्तर अली याच्याशी विवाह केला.

लखनौ, दि. ३१ डिसेंबर  : उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यातील एका गावात एक पाकिस्तानी सरपंच बनली आहे; परंतु ती महिला सरपंच बनेपर्यंत कोणालाही याबाबतची कल्पना नव्हती. ही बाब एवढ्यापुरती मर्यादित नाही, कारण सरपंच बनण्यासाठी त्या महिलेने बनावट आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्रदेखील बनवले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना मोठा झटका बसला आहे. या महिलेला निवडणूक लढण्यासाठी बनावट कागदपत्र, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र कुठून मिळाले, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानात राहणारी 64 वर्षीय बानो बेगम35 वर्षांपूर्वी एटा येथील एका गावात तिच्या नातेवाइकांकडे आली होती. त्यानंतर तिने तिथला तरुण अख्तर अली याच्याशी विवाह केला. तेव्हापासून ती भारतीय व्हिसा मिळवून भारतात राहात आहे; परंतु अद्याप तिला भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही. 2015 मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत बानो बेगमने अर्ज दाखल केला होता. ती निवडणूक जिंकली. त्यानंतर पाच वर्षांनी जानेवारीमध्ये गावच्या सरपंच शहनाज बेगम यांचे निधन झाले. त्यानंतर काहीच दिवसांत बानो बेगमने काही राजकीय समीकरणे जोडली आणि गाव समितीच्या शिफारशीनुसार बानो त्या गावची सरपंच झाली. पोलिसांनी याबाबत सांगितले, की बानो सातत्याने तिच्या व्हिसाचा कालावधी वाढवत येथेच राहात आहे.गावातील एक स्थानिक नागरिक कुवैदन खान यांना या महिलेबाबत संशय आला. त्यानंतर त्यांनी त्वरीत याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांत तक्रार दाखल होताच या महिलेने तिच्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा पंचायत राज अधिकारी आलोक प्रियदर्शी यांनी एटा जिल्हा दंडाधिकारी सुखलाल भारती यांच्यासमोर हे प्रकरण सादर केले आहे. त्यांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.ग्रामसचिवांची उचलबांगडीबानो बेगमविरोधात मिळालेल्या तक्रारीच्या आधारे ती पाकिस्तानची नागरिक असल्याचे आढळून आले आहे. तसेच तिने बनावट पद्धतीने भारताचे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डदेखील बनवले असल्याचे उघड झाले आहे. जिल्हा दंडाधिकारी भारती म्हणाले, की ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी महिलेने आधार कार्ड व इतर कागदपत्रे कशी मिळविली याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामागे जो कोणी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. बानो यांना सरपंच म्हणून नियुक्त करण्याची शिफारस करणारे ग्रामसचिव ध्यानपाल सिंह यांनादेखील त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे.

Share: