सभागृहात मोठा गोंधळ झाला. परिणामी विरोधी पक्षांमधील खासदार सभागृहातून बाहेर पडले.
नवी दिल्ली, दि. २४ : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी (२३ जुलै) लोकसभेत सादर करण्यात आला. त्यानंतर आता लोकसभा व राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील खासदार अर्थसंकल्पावरील आपापली मतं मांडत आहेत. लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला लोकसभेच्या अध्यक्षांकडून (ओम बिर्ला) सभागृहात ४ तास बोलण्याची परवानगी मिळाली आहे. लोकसभेत काँग्रेस खासदार आक्रमक झालेले असताना राज्यसभेतही काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेनेचा ठाकरे गट, तृणूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार आक्रमक झाले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षांमधील खासदारांनी सरकारवर भेदभावाचे आरोप केल्यानंतर सत्ताधारी खासदारांनी देखील प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ झाला. परिणामी विरोधी पक्षांमधील खासदार सभागृहातून बाहेर पडले.