सर्वोच्च न्यायालयाचा तसंच सरन्यायाधीशांचा अवमान झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
दिल्ली, दि. ३१ ऑगस्ट : न्यायालय अवमान प्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाने एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. सुप्रीम कोर्टाने प्रशांत भूषण यांना १५ सप्टेंबरपर्यंत हा दंड भरण्यास सांगितला आहे. दंड न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागले तसंच तीन वर्षांकरिता प्रॅक्टिस करण्यापासून रोखलं जाईल असं सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावताना म्हटलं आहे. न्यायालय अवमान प्रकरणी प्रशांत भूषण न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने शिक्षा सुनावली. प्रशांत भूषण यांना १४ ऑगस्टला दोषी ठरवण्यात आल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.प्रशांत भूषण यांनी केलेल्या दोन ट्विटमधून तसंच एका मुलाखतीमधून सर्वोच्च न्यायालयाचा तसंच सरन्यायाधीशांचा अवमान झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. याप्रकरणी सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांना बिनशर्त माफी मागायला सांगितली होती. मात्र न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला होता. दरम्यान, प्रशांत भूषण यांनी केलेल्या ट्विट्सवर सुप्रिम कोर्टाने सू-मोटो कारवाई करत न्यायालयाचा अवमान झाल्याचा खटला दाखल केला होता.