IMG-LOGO
राष्ट्रीय

उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी पुष्कर सिंह धामी यांची वर्णी

Sunday, Jul 04
IMG

भाजप युवा मोर्चाचे पुष्कर सिंह धामी हे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत.

डेहराडून, दि.  4 जुलै : उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा तीरथ सिंह रावत यांनी राजीनामा दिल्यामुळे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर उत्तराखंडच्या नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली आहे. पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.भाजप युवा मोर्चाचे पुष्कर सिंह धामी हे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. पुष्कर सिंह हे उधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पक्षातील तरुण आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी, माजी प्रदेशाध्यक्ष बिशनसिंग चुफल किंवा त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यापैकी कोणाचीही निवड केली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती.तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर दुपारी तीन वाजता डेहरादूनमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत पुष्कर सिंह यांचे नाव उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाले. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा होत होती. ती प्रत्यक्षात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी तीरथ सिंह रावत यांनी राज्यपाल बेबी रानी मौर्य यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या गंगोत्री आणि हल्द्वानी या दोन जागा रिक्त आहेत. तेथे पोटनिवडणूक घेतली जाणार आहे; पण राज्यात पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणूक होणार असल्यामुळे सदस्यत्वाचा एका वर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे. अशा परिस्थितीत कायदेतज्ज्ञांच्या मते निवडणूक घेणे, हे निवडणूक आयोगाच्या म्हणण्यावर अवलंबून असेल.पुष्करसिंह धामी यांनी 2002 ते 2008 पर्यंत प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा जन्म टुंडी, पिथौरागड येथे झाला. त्यांनी पदव्युत्तर पदवी आणि वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांना तीन बहिणी आहेत. त्यांचे वडील माजी सैनिक होते. उत्तराखंडमधील खटीमा विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा विजयी झाले आहेत. 2012 ते 2017 पर्यंत ते आमदार होते. 2017च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. अवघ्या दुसऱ्या टर्ममध्येच त्यांना मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यांनी 1990 ते 1999पर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये अनेक पदांवर काम केले आहे. भाजयुमोच्या अध्यक्षपदी असताना सहा वर्ष राज्यात फिरून बेरोजगार तरुणांचं संघटन उभारल्याचा धामी यांचा दावा आहे.रावत यांच्या राजीनाम्यानंतर धामी यांच्यासह अनेक नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. सतपाल महाराज, त्रिवेंद्र सिंह रावत, धनसिंह रावत आदी नेतेही या रेसमध्ये होते; मात्र या सर्वांना मागे टाकत धामी यांनी बाजी मारली आहे.ममतांच्या राजीनाम्याची चर्चापश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनाही सहा महिन्यांत विधानसभेवर निवडून यावे लागणार आहे. त्यांना नोव्हेंबरअखेर निवडून येता आले नाही, तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेत निवडणूक होते, की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आता ममतांनाही राजीनामा द्यावा लागतो, की काय अशी चर्चा आता तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्याने सुरू झाली आहे.

Share: