कोरोना व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटसचा संशोधकांमार्फत शोध लावला पाहिजे.
नवी दिल्ली,दि. ७ मे : देशातील कोरोनाची स्थिती दिवसे न् दिवस बिघडत आहे. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पत्र पाठविले आहे. राहुल यांनी देशाला कोरोनाच्या त्सुनामीचा धोका असल्याची भीती वर्तवतानाच कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी चार उपायही सुचवले आहेत. कोरोना व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटसचा संशोधकांमार्फत शोध लावला पाहिजे. त्याची माहिती संपूर्ण जगाला दिली पाहिजे आणि देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण केले पाहिजे, असे राहुल यांनी म्हटले आहे. तसेच सरकारच्या अपयशामुळे देशात पुन्हा एकदा देशव्यापी टाळेबंदी करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी गरीबांना तात्काळ आर्थिक मदत करावी. त्यांना गेल्या वर्षी प्रमाणे त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. आपला देश पुन्हा एकदा कोरोना त्सुनामीच्या उंबरठ्यावर आहे. अशा संकटावेळी देशातील लोकांची सुरक्षितता हेच आपले प्राधान्य असायला हवे. आपल्या देशातील लोकांना वाचवण्यासाठी जे प्रयत्न करता येईल, ते प्रयत्न करा. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, असा आग्रहही त्यांनी धरला आहे. वैज्ञानिक पद्धतीने व्हायरस आणि त्याच्या म्युटेशनला देशभर ट्रॅक करा. त्यासाठी जिनोम सिक्वेसिंगसह आजाराचा पॅटर्न समजून घेतला पाहिजे, या व्हायरसच्या विभिन्न स्वरुपाचा वैज्ञानिक पद्धतीने शोध घ्या. सर्व नवीन म्युटेशनच्या विरोधातील लसींचा काय परिणाम होतो, त्याचे आकलन केले पाहिजे, सर्व लोकांचं वेगाने लसीकरण करा.पारदर्शी राहावे, तसेच सर्व निष्कर्षांची माहिती जगाला द्यावी, असे उपाय राहुल यांनी सुचविले आहेत. आपण जे डबल आणि ट्रिपल म्युटेंट म्हणून पाहत आहोत. ती कोरोना संसर्गाची सुरुवात तर नाही ना, याची मला भीती वाटते. या व्हायरसचा अनियंत्रितपणे प्रसार होणे केवळ आपल्या देशातील लोकांसाठीच घातक ठरणारे नाही, तर जगासाठीही धोकादायक आहे, असे सांगतानाच केंद्राकडे लसीकरणाचे कोणतेही स्पष्ट धोरण नाही. ज्या वेळी व्हायरस फैलावत होता, त्याचवेळी सरकारने कोरोनावर विजय मिळवल्याची घोषणा केली होती, असेही ते म्हणाले.