IMG-LOGO
लोकसभा २०२४

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरला; त्यांच्या संपत्तीची सर्वाधिक चर्चा

Thursday, Apr 04
IMG

केरळमधील लोकसभेच्या २० जागांसाठी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

वायनाड, दि. ४ : केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे. केरळमधील लोकसभेच्या २० जागांसाठी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यात वायनाड लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.राहुल गांधी यांची एकूण संपत्ती २०.४ कोटी आहे. त्यात ९.२४ कोटी रुपयांची जंगम आणि ११.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांनी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड व सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.  तसेच १५.२१ लाख रुपयांचे सॉव्हरिन गोल्ड बाँड आहेत.  शेअर बाजार व म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची माहितीही समोर आली आहे. त्यानुसार शेअरमध्ये त्यांची ४.३ कोटी रुपयांची गुंतवणूक असून म्युच्युअल फंडांत ३.८१ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. राहुल गांधी यांच्याकडे ४.२ लाख रुपयांचे दागिने आहेत. याशिवाय त्यांच्यावर ४९.७ लाखांचे कर्जही आहे.

Share: