देशात मंगळवारी गेल्या 14 दिवसांतील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या सर्वांत कमी आढळून आली.
नवी दिल्ली, दि. ११ मे : देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेने रोज तीन लाखांवर नवीन रुग्ण आढळून येत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलासा देणारी बातमी दिली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि दिल्लीसह देशातील एकूण 18 राज्यांमधील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली तसेच देशाचा पॉझिटिव्हिटी दर सरासरी 21 टक्के इतका आहे.देशात मंगळवारी गेल्या 14 दिवसांतील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या सर्वांत कमी आढळून आली; पण अजूनही देशात कोरोनाचे रोज तीन लाखांवर नवीन रुग्ण आढळून येत आहे. त्यातच आरोग्य मंत्रालयाने 18 राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत असल्याची माहिती दिली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरयाणा, छत्तीसगड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगण, चंदीगड, लडाख, दमण-दीव, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार यांचा या 18 राज्यांमध्ये समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली.कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, आसाम, जम्मू-काश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेश, पुदुच्चेरी, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, आणि अरुणाचल प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे, असे अग्रवाल म्हणाले. देशातील 13 राज्यांमध्ये एक लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सहा राज्यांमध्ये 50 ते एक लाखांवर अॅक्टिव्ह रुग्ण आहेत आणि 17 राज्यांमध्ये 50 हजारांवर अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, 18 राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत असल्याने देशाचा पॉझिटिव्हिटी दर हा कमी होत असल्याचे संकेत आहेत. हा दर आता 21 टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती ’आयसीएमआर’चे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली. 27 एप्रिलपासून देशाच्या पॉझिटिव्हिटी दरात घट दिसून येत आहे. देशातील 734 जिल्ह्यांपैकी 310 जिल्ह्यांमध्ये अजूनही पॉझिटिव्हिटी दर हा 42 टक्क्यांवर आहे; पण देशाचा एकूण सरासरी दर हा आता 21 टक्क्यांवर आला आहे, असे भार्गव म्हणाले.चाचण्यांचा जागतिक विक्रमदेशात 30 एप्रिलला 19 लाख 45 हजार 299 इतक्या कोरोनाच्या चाचण्या झाल्या. कोरोना चाचण्यांचा हा जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. वेळेवर चाचणी, विलगीकरण आणि घरी राहूनच घेतलेल्या खरबदारीने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणता येऊ शकतो. देशात सध्या रोज 16 लाखांवर आरटीपीसीआर चाचण्या होत आहेत. रॅपिड अॅन्टिजेन टेस्टची क्षमताही 17 लाखांवर गेली आहे. तसेच चाचण्यांची संख्या पाहता लॅब 24 तास काम करत आहेत. प्रयोगशाळेतील कर्मचारीही बाधित आढळून आले आहेत, तरीही चाचण्यांच्या तपासणीची संख्या वाढती राहील, याची दक्षता घेतली जात आहे, असे भार्गव म्हणाले.