IMG-LOGO
राष्ट्रीय

'मिशन युपी' त आता संघाची उडी

Friday, Jul 02
IMG

संघाचे नवे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लखनऊचा दौरा करणार आहेत.

लखनऊ, दि.  2 जुलै : उत्तर प्रदेशात 2022मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत मोठे अपयश आल्याने भाजपने ‘मिशन यूपी’साठी कंबर कसली असून त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही उडी घेतली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संघाचे नवे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लखनऊचा दौरा करणार आहेत, तर भैयाजी जौशी हे राम मंदिर प्रकल्पाचे केअर टेकर असणार आहेत. त्यामुळे भाजपबरोबर संघही मिशन 2022साठी सक्रिय झाला आहे. पुढच्यावर्षी पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्यात उत्तर प्रदेशातील निवडणूक ही सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. 15 वर्षाच्या राजकीय वनवासानंतर भाजप उत्तर प्रदेशात सत्तेत आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सर करण्यासाठी भाजप कामाला लागला आहे. उत्तर प्रदेशातील सत्ता भाजपच्या हातून जाऊ नये, म्हणून संघही कामाला लागला आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि वैचारिक कारणाने उत्तर प्रदेश अत्यंत महत्त्वाचे असल्याने संघ आणि भाजपला तिथली सत्ता हातून जाऊ द्यायची नाही, त्यामुळे या दोन्ही संघटनांनी कंबर कसली आहे.2022मध्ये उत्तर प्रदेशातील निवडणुका झाल्यानंतर 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहे. लोकसभेत चांगले यश मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश जिंकणे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य असल्याने भाजपने उत्तर प्रदेशसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवाय 2025मध्ये संघाचे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्ता असणे संघ आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच संघाचे नवे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे हे नागपूर मुख्यालयात राहण्याऐवजी लखनऊमध्ये राहून मिशन उत्तर प्रदेशावर जोर देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.होसबळे यांच्यासह भैयाजी जोशीही उत्तर प्रदेशातच राहणार आहेत. भैयाजी जोशी अयोध्येतील राम मंदिर प्रकल्पाचे केअरटेकर असतील. ते या प्रकल्पावर नजर ठेवून असतील. राम मंदिराच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाण्याची भाजपची योजना असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे होसबळे आणि जोशी पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात एकत्र राहणार असून पडद्यामागून राजकीय वातावरण निर्मिती करण्याचे काम करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Share: