IMG-LOGO
राष्ट्रीय

काहींना महापुरूष आणि नंतर देव बनायचं असतं : मोहन भागवत

Saturday, Jul 20
IMG

‘विकास भारती’ या ना-नफा संस्थेने आयोजित केलेल्या ग्रामस्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत सरसंघचालक बोलत होते.

गुमला, दि. २०  : झारखंडमधील गुमला येथे एका ग्रामीण स्तरावरील कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात (दि. १८ ) मार्गदर्शन करत असताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मानवाच्या महत्त्वाकांक्षेबाबत भाष्य केले. “काही लोक आधी सुपरमॅन (महापुरुष), त्यानंतर पूजनीय आणि पूजनीय नंतर देव बनू पाहत आहेत”, भागवत यांनी असे विधान केले आहे.  भागवत म्हणाले, “जेवढा विकास करण्याचा विचार केला होता, तिथवर आपण पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर दिसते की, यापुढेही बरेच काही करण्यासारखे आहे. पण ज्या माणसात माणुसकी नाही, त्याने आधी माणूस बनावे. पण काही लोक विकासाच्या निर्धारीत टप्प्यावर पोहोचल्यावर मानवाचे सुपरमॅन बनू पाहतात. सुपरमॅन बनल्यावरही ते थांबत नाहीत, त्यांना वाटते आता पूजनीय बनायला हवे. पण पूजनीय म्हणतात आमच्यापेक्षा देव मोठे, तर देव म्हणतो माझ्यापेक्षा विश्वरुप मोठे. आता विश्वरुपाच्या पुढेही काही आहे का? हे कुणाला माहीत नाही. विकासाचा काही अंत नाही. ही निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे. ‘‘गेल्या २००० वर्षांत वेगवेगळे प्रयोग केले गेले, पण ते भारताच्या पारंपरिक जीवन पद्धतीत रुजलेले आनंद आणि शांती देण्यात अयशस्वी ठरले. करोनानंतर जगाला कळले की भारताकडे शांती आणि आनंदाचा रोडमॅप आहे, असे भागवत म्हणाले. ‘विकास भारती’ या ना-नफा संस्थेने आयोजित केलेल्या ग्रामस्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत सरसंघचालक बोलत होते.

Share: