IMG-LOGO
राष्ट्रीय

शिखर गाठून पुन्हा घसरण

Thursday, Jan 21
IMG

अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी बुधवारी सूत्रे हाती घेतली. त्यानंतर आर्थिक पॅकेजला गती मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई, दि. २१ जानेवारी : तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्सने आज गुरुवारी ऐतिहासिक 50 हजारांचा टप्पा ओलांडला. भांडवली बाजाराच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सेंसेक्सने 50 हजारांचे शिखर सर केले. त्यांनतर मात्र घसरण झाली. सध्या बाजारात चौफेर खरेदीचा ओघ सुरू आहे. आजच्या सत्रात आयटी, ऑटो, एफएमसीजी, बँका या शेअरमध्ये वाढ झाली आहे. अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी बुधवारी सूत्रे हाती घेतली. त्यानंतर आर्थिक पॅकेजला गती मिळण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हच्या माजी अध्यक्ष जेनेट येलन यांची ट्रेझरी सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली आहे. येलन यांनी यापूर्वीच कोरोना रोखण्यासाठी मोठ्या आर्थिक पॅकेजचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. फेडरल रिझर्व्ह आगामी पतधोरणात काय भूमिका घेते याची गुंतवणूकदारांना उत्सुकता लागली आहे. बायडन यांच्या हाती सत्ता आल्यानंतर अमेरिकेतील भांडवली बाजारात जल्लोष दिसून आला. बुधवारी अमेरिकेतील सर्वच शेअर बाजार तेजीसह बंद झाले. त्याचे पडसाद आज आशियातील भांडवली बाजारावर उमटल्याचे शेअर दलालांचे म्हणणे आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. शेअर बाजाराच्या माहितीनुसार बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2289 कोटींचे शेअर खरेदी केले, तर स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 864 कोटीचे शेअर विक्री केले. दरम्यान परदेशी गुंतवणुकीचा वाढत ओघ रुपयाला फायदेशीर ठरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 12 पैशांनी वधारला. बुधवारी सलग दुस-या सत्रात रुपया 73.05 वर स्थिरावला होता.

Share: