IMG-LOGO
COVID-19

सीरम आणि बायोटेकच्या लसीला उद्या मंजुरी मिळण्याची शक्यता

Thursday, Dec 31
IMG

सीरमने लसीचे सहा कोटी डोस तयार केले आहेत. फेब्रुवारीपर्यंत आणखी दहा कोटी डोस तयार होतील. मंजुरी मिळताच पुरवठा सुरू होईल. आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मिळेल.

पुणे, दि. ३१ डिसेंबर : ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोविशील्ड या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात लसीकरण सुरू होण्याची अपेक्षा वाढली आहे. देशात ऑक्सफर्डच्या लसीचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. तज्ज्ञ समितीसमोर सीरम आणि भारत बायोटेक लसीच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंतचा डेटा सादर करण्यात आला. समिती त्याचा उद्या (ता. १) जानेवारीला आढावा घेईल. त्याच दिवशी लसीला मंजुरी मिळू शकते, अशी चर्चा आहे.सीरमने लसीचे सहा कोटी डोस तयार केले आहेत. फेब्रुवारीपर्यंत आणखी दहा कोटी डोस तयार होतील. मंजुरी मिळताच पुरवठा सुरू होईल. आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मिळेल. ज्या राज्यांत आरोग्य कर्मचारी जास्त असतील, तेथे जास्त डोस दिले जातील. दुसरीकडे, देशात कोरोनाच्या नव्या स्वरूपाच्या रुग्णांची संख्या २० झाली आहे. सरकारने ब्रिटनला जाणाऱ्या-येणाऱ्या उड्डाणांवरील बंदी बंदी ३१ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी नागरिकांना लस देण्यात येईल. लसीकरण अभियानात को-विन मोबाइल अॅप आणि वेबसाइटचा होणार वापर करण्यात येणार आहे.  को-विनवर नोंदणीसाठी मतदान ओळखपत्रासह १२ ओळखपत्रे वैध असतील. नोंदणी केलेल्यांनाच लस टोचली जाईल. ऐनवेळी नोंदणी केली जाणार नाही.  नोंदणी केलेल्या व्यक्तीला एसएमएसद्वारे माहिती मिळेल. प्रत्येक बूथवर दिवसाला शंभर जणांना लस दिली जाईल. तसेच प्रतीक्षालयाची सुविधा असलेल्या ठिकाणी २०० जणांना लस देण्याची तयारी आहे. कोरोना ड्युटीत फ्रंटलाइन वर्कर उदा. डॉक्टर, नर्स, आशा वर्कर आदींना सर्वांत आधी लस मिळेल. देशात फ्रंटलाइन वर्करची संख्या एक कोटी आहे.  पोलिस, तसेच सार्वजनिक ठिकाणी काम करणा-यांना तसेच ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणा-यांना  आणि अस्थमा, हृदयरोग, मधुमेह असेल तर त्यानंतरच्या टप्प्यात लस मिळेल. लसीची पहिली वा दुसरी खेप या गटांना आधी मिळेल. अति संक्रमित क्षेत्रातील लोकांनाही कोरोनाची लस आधी देण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी, आवश्यक सेवा आणि ज्येष्ठ तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनंतर इकरांना लस दिली जाईल. जे वरील श्रेणींपैकी कोणत्याही श्रेणीत नाहीत, त्यांनाही लस मिळेल. लसीची उपलब्धता वाढल्यानंतर लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते.

Share: