’सीरम’ही जगाला लसी निर्यात करणारी जगातील मोठी लस उत्पादक कंपनी आहे.
पुणे, दि. ७ मे : भारतात लस देण्यावरून येत असलेला राजकीय दबाव, धमक्यांमुळे ’सीरम’ चे ’सीईओ’ अदार पूनावाला परदेशात गेले आणि त्यांनी पुण्याऐवजी ब्रिटनमध्ये दोन हजार चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली, असे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात पुण्याऐवजी ब्रिटनमध्ये व्यावसायिक गुंतवणूक करण्याचा त्यांचा हेतू निव्वळ व्यावसायिक आहे, अशी माहिती पुढे येत आहे.’सीरम’ही जगाला लसी निर्यात करणारी जगातील मोठी लस उत्पादक कंपनी आहे. कोरोनाच्याच नाही, तर अन्य साथीच्या आजारावरील लसीचे उत्पादन तिथे होते. कोरोना लसीच्या उत्पादनातही ही कंपनी आघाडीवर आहे. लस उत्पादन करताना ती केवळ देशात विकून चालत नसते, तर ती निर्यात करून, त्यातून उत्पन्न मिळवायचे असते. कोरोना लसीच्या उत्पादन केल्यानंतर ’सीरम’ने जगातील अनेक देशांना लसी पुरवण्याचा करार केला होता; परंतु भारतात कोरोनाचे प्रमाण जसे वाढायला लागले, तसे कोरोनाच्या लसी निर्यात करण्यावर बंधने घालण्यात आली. ’सीरम’सारख्या कंपन्यांची जगात एक प्रतिमा तयार झालेली असते. कोरोना लसीची निर्यात थांबल्यामुळे तिच्या जागतिक प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता होती. त्यातच भारताने ठराविक दरानेच लसी खरेदी केल्यामुळे ’सीरम’च्या नफ्यावर परिणाम व्हायला लागला होता. अमेरिका आणि युरोपने कोरोना लसीसाठी आवश्यक तो कच्चा माल पुरवण्यावर निर्बंध घातले. त्याचा परिणाम व्हायला लागला होता.या पार्श्वभूमीवर अदर पुनावाला यांनी अचानक लंडनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे जाऊन त्यांनी ब्रिटनमध्ये व्यावसायिक गुंतवणुकीचा करार केला. मॉडर्नासारख्या कंपन्या ’सीरम’ला जागतिक स्तरावर आव्हान देत आहेत. लस राष्ट्रवाद, बौद्धिक मालमत्ता कायदा यासारख्या निर्बंधांमुळे ’सीरम’ च्या प्रगतीत अडथळे यायला सुरुवात झाली आहे. भारतातील लसींच्या किंमती कमी झाल्यामुळे नफा कमी होत आहे. त्यामुळेच पूनावाला यांनी ब्रिटनमध्ये दोन हजार चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. भारतात लस पुरवठ्यावर बराच दबाव आहे. मुख्यमंत्री आणि कॉर्पोरेटमधील मोठ्या व्यक्ती त्यांना धमकावत आहेत. जेव्हा ब्रिटनमध्ये गुंतवणुकीचा करार होत होता, त्याच वेळी भारतात या निर्णयाबद्दल बरेच प्रश्न निर्माण झाले होते. पूनावाला यांची गुंतवणूक अचानक किंवा घाईघाईने घेतलेला निर्णय नाही तर ती एक व्यूहात्मक चाल आहे, असे सांगितले जाते. द इंडिपेंडेंट मीडिया हाऊस ’द केन’ च्या अहवालानुसार कोरोनामुळे लस आणि औषध उत्पादकांना सर्वाधिक फायदा झाला आहे. ’सीरम’ ला तर जणू लॉटरीच लागली. मार्च 2020 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात ’सीरम’च्या देशांतर्गत व्यवसायात वीस टक्के् घट झाली होती. मध्यम व निम्न उत्पन्न असलेल्या देशांतून आलेल्या मागणीमुळे ’सीरम’ पुढे आशेचा किरण आहे. ’केन’च्या अहवालानुसार, ’सीरम’ने लस डोस तयार करण्याची क्षमता एक अब्ज डोसपर्यंत वाढविली आहे. या कंपनीने ’स्पाइकॅचर’ नावाच्या पूर्णपणे नवीन तंत्रज्ञानाने बनविलेल्या दुसर्या कोरोना लसीसाठी परवाना मिळविला आहे. याशिवाय मलेरियाची लस लवकरच बाजारात आणण्याचीही कंपनीची तयारी आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ’सीरम’ दोन हजार 460 कोटी म्हणजेच 240 दशलक्ष पौंडाची गुंतवणूक करीत असल्याची घोषणा केली, तेव्हा ’सीईओ’ अदार पूनावाला यांच्या जवळच्यांना नवल वाटले नाही. सद्यस्थितीत जगातील प्रत्येक देश आपल्या लोकांसाठी अधिकाधिक लस शोधत आहे आणि याला लस राष्ट्रवाद म्हणतात. अशा वातावरणात, जर खिशात बरीच रोकड असलेली एखादी कंपनी नवीन देशांमध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधत असेल, तर ती निश्चितच तिची दीर्घकालीन रणनीतिक गुंतवणूक आहे. ब्रिटीश वृत्तपत्र ’टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला सांगतात, की जानेवारीत अॅस्ट्रॅजेनेका लस मंजूर होईपर्यंत कंपनीने आठशे दशलक्ष डॉलर्सच्या वार्षिक डोस उत्पादनाची क्षमता दीड अब्ज ते अडीच अब्ज डॉलर केली. आणखी सहा महिन्यांत ही क्षमता तीन अब्ज डोसपर्यंत पोहोचेल. युरोपमधून कच्च्या मालाची उपलब्धता, अमेरिकेतून मिळणार असलेला कच्चा माल आणि निर्यातीवर तिकडे नसलेली बंधने यामुळे पूनावाला यांनी ब्रिटनमध्ये गुंतवणूक केली असावी.