दिल्लीत गेल्या काही आठवड्यांपासून ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे.
सर्वोच्च न्यायालयाची दिल्ली सरकारला सूचना; मुंबईचे कौतुकनवी दिल्ली, दि. ६ मे : दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी मुंबई मॉडेल स्वीकारण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या ऑक्सिजन व्यवस्थापनाची सर्वोच्च न्यायालयाने स्तुतीही केली आहे.दिल्लीत गेल्या काही आठवड्यांपासून ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे दिल्लीकरांना ऑक्सिजनसाठी वणवण भटकावे लागत आहे. याप्रकरणी आधी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आले आहे. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेने ज्या पद्धतीने ऑक्सिजनचं व्यवस्थापन केलं. ते मॉडल दिल्ली सरकारने अवलंबावं. दिल्ली सरकारने मुंबई महापालिकेकडून काही चांगल्या गोष्टी घ्याव्यात, असे म्हटले आहे. न्यायामूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी हा सल्ला दिला.मुंबई महापालिकेने कोरोना काळात चांगले काम केले आहे. अशावेळी दिल्लीने काही शिकले पाहिजे. वैज्ञानिक पद्धतीने काम केले पाहिजे, असे न्या. चंद्रचूड म्हणाले. चार अधिकार्यांना तुरुंगात टाकल्याने ऑक्सिजन येणार नाही. लोकांचे जीव कसे वाचतील याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. मुंबई मॉडेल हे काही राजकीय मॉडेल नाही. न्यायालयातील अधिकारी हे काही केंद्र किंवा राज्यांचे नाही. आपल्याला यातून मार्ग काढला पाहिजे. मुंबई महापालिका काय करत आहे, कसे करत आहे? हे जाणून घेण्याचा सल्ला न्यायालयाने दिला.सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उद्या सकाळपर्यंत ऑक्सिजन पुरवठ्याबाबत एक चांगली योजाना सादर करण्यास सांगितली आहे. जेणेकरून दिल्लीला त्यांचा 700 टन ऑक्सिजनचा कोटा मिळू शकेल. त्यांनी ’आम्ही दिल्लीच्या जनतेला उत्तरदायी आहोत. आम्ही अवमानाची याचिका पुढे नेऊ इच्छित नाही. आम्हाला खालच्या स्तरावर कारवाई झालेली हवी आहे.’ असेही मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. जर दिल्लीचे आरोग्य सचिव आणि केंद्र सरकारच्या अधिकार्यांची मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी चर्चा झाली असेल, त्यात ऑक्सिजन स्टोरेज टँक कशा तयार करायच्या याची माहिती घेतली असेल, तर दिल्लीसाठी हा प्लान कसा राबवणार याची माहिती आम्हाला द्या, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.काय आहे मुंबई मॉडल?कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. यावेळी मुंबई महापालिकेने तातडीने ऑक्सिजनचे नियोजन केले. महापालिकेने ऑक्सिजन पुरवठा सिस्टिम वाढवली. 28 हजार बेडपैकी 12 ते 13 हजार बेडवर ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची व्यवस्था केली. त्यानंतर महापालिकेने ऑक्सिजन सिलिंडरही बदलण्यास सुरुवात केली. सुरुवातीला महापालिका साधारण ऑक्सिजन सिलिंडरवर अवलंबून होती. नंतर पालिकेने जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा वार केला. साधारण ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा या सिलिंडरची क्षमता दहा टक्के अधिक असते. त्याचबरोबर पालिकेने 13 हजार किलो लीटरची मेडिकल ऑक्सिजन टँक तयार केली. त्यामुळे रुग्णालये रिफिल मोडवरून स्टोरेज सप्लाय मोडवर आले.