केंद्र शासनाच्या एफएसएसी, नाबार्ड, एमसीडीसी यांच्यामार्फत समूह आधारीत व्यावसायिक संस्थांची नेमणूक केली जाते.
दादा भुसे यांची माहिती; समूह आधारित व्यावसायिक संस्थांची नियुक्तीमुंबई, दि. २५ मार्च : राज्यात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. शेतकरी उत्पादक कंपनी योजना यशस्वी करण्यासाठी पीक पद्धती, कृषी विद्यापीठ, सेवाभावी संस्था यांच्या विविध कार्यक्रमांची सांगड घालावी. या शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात शेतकर्याला फायदा देणार्या असाव्यात, असे त्यांनी सांगितले. केंद्र शासनामार्फत राज्यात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या करण्याची योजना राबविण्यात येत असून या कंपन्या तयार करण्याकरीता समूह आधारित व्यावसायिक संस्थांची नियुक्ती राज्यात करण्यात आली आहे. या संस्थांची बैठक कृषिमंत्र्यांनी आज मंत्रालयात घेतली. या वेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या एफएसएसी, नाबार्ड, एमसीडीसी यांच्यामार्फत समूह आधारीत व्यावसायिक संस्थांची नेमणूक केली जाते. राज्यासाठी अशा 34 संस्थांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. एका शेतकरी उत्पादक कंपनीत तीनशे शेतकरी असतील. या संस्थांनी कृषी विभागाशी समन्वय ठेवून शेतकर्यांना एकत्रित करून प्रत्यक्ष काम करणारी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी. चांगल्या भावनेतून हा प्रकल्प आखण्यात आला असून त्याचा हेतू साध्य होण्यासाठी संस्थांनी मनापासून काम करण्याचे आवाहन भुसे यांनी केले. शेतकर्यांना प्रत्यक्षात लाभ मिळावा, त्यांची प्रगती व्हावी, शेतकर्यांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन कृषी उत्पादनात वाढ व्हावी, याला सुसंगत असे काम संस्थांनी करावे, असे निर्देश कृषिमंत्र्यांनी या वेळी दिले. या योजनेसाठी केंद्र शासनाने जी नियमावली केली आहे, तिचे पालन करतानाच शेतकरी उत्पादक संस्था केवळ कागदावर राहू नयेत, यासाठी केंद्र शासनाला पत्राद्वारे कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्यात कृषी विभागामार्फत येणारे वर्ष उत्पादकता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. रासायनिक खतांचा वापर दहा टक्के कमी करावा. शेततळ्यांचे अस्तरीकरण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन कृषिमंत्र्यांनी या वेळी केले.