IMG-LOGO
राष्ट्रीय

तृणमूल काँग्रेसवर जनतेची ’ममता’!

Sunday, May 02
IMG

बंगालमधील कोरोनाच्या केसेस वाढू लागल्यानेच सहाव्या, सातव्या आणि आठव्या टप्प्यातील मतदानाच्या वेळी मतदारांनी ममता बॅनर्जींना भरभरून मतदान केले.

कोलकाता, दि. २ मे : पश्‍चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय होण्यामागे विविध कारणे सांगितली जात आहेत. मतदानाच्या शेवटच्या तीन टप्प्यात भाजपसोबत खेला झाल्याचे बोलले जात असून बंगालसह देशभरात कोरोनाचं संकट वाढल्याने बंगालच्या मतदारांनी शेवटच्या तीन टप्प्यात ममतादीदींच्या बाजूने कौल दिल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. बंगालमधील कोरोनाच्या केसेस वाढू लागल्यानेच सहाव्या, सातव्या आणि आठव्या टप्प्यातील मतदानाच्या वेळी मतदारांनी ममता बॅनर्जींना भरभरून मतदान केले. या तीन टप्प्यातील मतदारसंघांमध्येच प्रचंड मते मिळाल्याचे दिसून आले आहे. या कलानुसार या तीन टप्प्यातील मतदारसंघातील 75 जागा तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात गेल्या. 36 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. शेवटच्या तिन्ही टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. हे मतदान भाजपविरोधी होते, असे स्पष्ट होऊ लागले आहे. केंद्रात भाजप असतानाही कोरोना रोखला जात नसल्याचा मेसेज जनतेत गेला. त्याचा परिणाम म्हणून नागरिकांनी ममता दीदींच्या पारड्यात मतदानाचे दान टाकले. या टप्प्यात उत्तर बंगालच्या उत्तर दिनाजपूर आणि दक्षिण बंगालमध्ये नदिया, दक्षिण 24 परगना आणि पूर्वी बर्दवानच्या 43 जागांवर मतदान झाले होते. दक्षिण 24 परगनामध्ये 17, उत्तरी दिनाजपूर आणि नदियामध्ये 9 आणि पूर्व बर्दवानच्या 8 जागांवर मतदान झाले होते.26 एप्रिल रोजी सातव्या टप्प्यात 36 जागांवर मतदान झाले. त्या वेळी राज्यात कोरोनाचे 15 हजार 992 रुग्ण सापडले होते. या टप्प्यात पाच जिल्ह्यात मतदान झाले होतं. त्यात दक्षिण दिनाजपूर, मालदा (6 जागा), मुर्शिदाबाद (11), कोलकाता (4) आणि पश्‍चिम बर्दवान (9) आदी जागांचा समावेश होता. कोरोनामुळे या मतदारसंघातही मतदारांनी भाजपला नाकारले; परंतु या मतदारसंघांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 40 टक्के आहे. हा संपूर्ण मतदार ममता बॅनर्जी यांच्या बाजूने आलेला दिसत आहे. आकडेवारीनुसार या मतदारसंघांमध्ये 40 टक्के मुस्लिम, 18 टक्के दलित, 6 टक्के आदिवासी मतदार आहेत. या टप्प्यातील 26 मतदारसंघात मुस्लिमांची लोकसंख्या 20 टक्के आहे, तर 18 जागांवर एससीची हिस्सेदारी समान आहे.  पश्‍चिम बंगालमध्ये 29 एप्रिल रोजी आठव्या टप्प्यासाठी मतदान झाले होते. या शेवटच्या टप्प्यात 35 जागांवर मतदान झाले होते. त्यात मालदा (6), मुर्शिदाबाद (11), कोलकाता (7) आणि बीरभूम (11) जागांचा समावेश आहे. जंगीपूर और शमशेरगंजमधील दोन उमेदवारांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने या ठिकाणी 16 मे रोजी मतदान घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. या वेळी डावे आणि काँग्रेसच्या जागा तृणमूल काँग्रेसच्या खात्यात जाताना दिसत आहेत. या निवडणुकीत भाजप दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. मात्र, भाजपला ज्या पद्धतीने विजय हवा होता, तसा विजय न मिळाल्याने भाजपमध्ये नैराश्य पसरले आहे.नंदीग्राममध्ये काळेबेरेनंदीग्राम या अतिशय प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सकाळपासून कधी ममता दीदी, तर कधी सुवेंदू अधिकारी पुढे जात होते. अखेर ममतांंचा बाराशे मतांनी पराभव झाल्याचे जाहीर करण्यात आले; परंतु ममता दीदी यांनी अगोदर विजय घोषित करून नंतर पराभव झाल्याचे कसे जाहीर केले, तिथे काळेबेरे झाल्याचा आरोप केला आहे. एका फेरीत ममता आणि अधिकारी यांच्यात सहा मतांचा फरक होता.

Share: