माझ्या राज्यात हिंसा सुरू आहे. त्यावर आपण काहीच बोलू शकत नाही. या विषयावर जर काही बोलू शकत नाही, तर मग मी त्यापेक्षा माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा देतो, अशी खदखद त्रिवेदी यांनी व्यक्त केली.
ममतादीदींना मोठा धक्का; भाजपत प्रवेशाची शक्यतानवी दिल्ली, दि. १२ फेब्रुवारी : तृणमूल काँग्रसेच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज संसदेत बोलता बोलता आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभेचा खासदार असूनही राज्यातील हिंसाचारावर तोडगा काढू शकत नाही. त्यामुळे घुसमट होते, अशी प्रतिक्रिया देत त्रिवेदी यांनी राजीनामा दिला. माझ्या राज्यात हिंसा सुरू आहे. त्यावर आपण काहीच बोलू शकत नाही. या विषयावर जर काही बोलू शकत नाही, तर मग मी त्यापेक्षा माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा देतो, अशी खदखद त्रिवेदी यांनी व्यक्त केली. मी माझ्या पक्षाचा आभारी आहे. त्यांनी मला राज्यसभेत पाठवले; पण आता माझी घुसमट होते आहे. माझा अंतरात्मा मला सांगतो, इथे बसून जर काही करू शकत नाही, तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यामुळे मी राजीनामा देतो आहे; मात्र मी राजीनामा दिल्यानंतरही पश्चिम बंगालच्या लोकांचे काम करत राहील, असे त्रिवेदी म्हणाले. भाजप पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला लागला आहे. ममता सरकारला सुरुंग लावण्यासाठी भाजप सर्वेतोपरी प्रयत्न करत आहे. भाजपने याआधी ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे निकटवर्तीय मानले जाणारे सुवेंदू अधिकारी, मुकूल रॉय यांसारख्या बड्या नेत्यांना भाजपत सामील करुन घेतले आहे. भाजपने आता त्रिवेदी यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्रिवेदीदेखील भाजप प्रवेशासाठी सकारात्मक असल्याची चर्चा आहे; मात्र याबाबत अद्याप अधिकृत अशी कोणतीही माहिती भाजप आणि त्रिवेदी यांच्याकडून देण्यात आलेली नाही. दरम्यान, त्रिवेदी यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर भाजपचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी त्रिवेदी यांना भाजपत येण्याचे खुले आमंत्रण दिले आहे. त्रिवेदी वर्षभरापूर्वी मला एका विमानतळावर भेटले होते. तेव्हा परिस्थिती खूप विचित्र आहे. त्यामुळे काम करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यांनी आता तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ते भाजपत आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे विजयवर्गीय म्हणाले आहेत.