IMG-LOGO
राष्ट्रीय

बाँबस्फोटात तीस जण ठार

Thursday, Jan 21
IMG

इराकमधील मोसूल जवळ रविवारी 17 जानेवारीला बॉम्बस्फोट झाला. त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये सुरक्षा दलाच्या सहा कर्मचार्‍यांचा आणि एक नागरिकाचा मृत्यू झाला.

बगदाद, दि. २१ जानेवारी :  इराकची राजधानी बगदाद पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले आहे. बगदादमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे, तर 20 जण या स्फोटामध्ये जखमी झाले. पोलिस आणि वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने बॉम्ब स्वत:च्या शरीरावर लावून बगदादमधील बाजारात प्रवेश केला आणि स्फोट घडवून आणला. ही घटना बगदादमधील तायरण चौकात घडली आहे. पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली. स्फोटातील जखमींची प्रकृती गंभीर आहे. इराकची राजधानी बगदादमध्ये आज झालेला अतिरेकी हल्ला 2017 नंतरचा सर्वांत मोठा हल्ला आहे. इराकमधील या हल्ल्याची आतापर्यंत कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. हा हल्ला इसिस या संघटनेने केला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. हल्लेखोराने प्रथम आजारी असल्याचे नाटक करून बाजारपेठेत प्रवेश केला. आजारी असल्याचे नाटक केल्याने जमाव झाला. गर्दी झालेली पाहून त्याने स्वत:ला उडवून दिले. दुसरा हल्लेखोर मोटारसायकलवरुन आला त्यानेही स्वत: ला उडवून दिले.  इराकमधील मोसूल जवळ रविवारी 17 जानेवारीला बॉम्बस्फोट झाला. त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये  सुरक्षा दलाच्या सहा कर्मचार्‍यांचा आणि एक नागरिकाचा मृत्यू झाला. चार दिवसांच्या अंतरामध्येच दुसरा बॉम्बस्फोट झाल्यामुळे इराकमधील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Share: