IMG-LOGO
राष्ट्रीय

अमेरिका आणि चीनमध्ये खडाजंगी

Friday, Mar 19
IMG

दोन्ही देशांमध्ये तिबेट, हाँगकाँग आणि चीनच्या पश्‍चिम भागातील शिनझियांग प्रांतात व्यापारापासून ते मानवाधिकारांच्या अनेक मुद्यांवर तीव्र मतभेद आहेत.

अलास्का, दि. १९ मार्च : जो बायडेन यांनी अमेरिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर अमेरिका आणि चीनमध्ये पहिल्यांदाच समोरासमोर बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाचे प्रतिबिंब उमटले. या बैठकीत दोन्ही देशांनी एकमेकांच्या धोरणांवर टीका केली. या वादाची ठिणगी बैठक सुरू होण्याआधीच्या पत्रकार परिषदेत पडली. अलास्कामध्ये दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथोनी ब्लिंकन आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे परराष्ट्र धोरणाचे प्रमुख यांग जियेची यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. दोन्ही देशांनी एकमेकांच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका केली. अंकरेज शहरात पार पडत असलेल्या या बैठकीत सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. मागील वर्षभरात दोन्ही देशांमधील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर होणारी बैठक अतिशय महत्त्वाची आहे.दोन्ही देशांमध्ये तिबेट, हाँगकाँग आणि चीनच्या पश्‍चिम भागातील शिनझियांग प्रांतात व्यापारापासून ते मानवाधिकारांच्या अनेक मुद्यांवर तीव्र मतभेद आहेत. त्यातच तैवानचा मुद्या, दक्षिण चीन समुद्रात चीनचे वाढते प्रभुत्व आणि कोरोना संसर्गावरूनही वाद आहेत. या बैठकीपूर्वी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथोनी ब्लिंकन आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे परराष्ट्र धोरणाचे प्रमुख यांग जियेची यांनी संबोधित केले. त्या वेळी ब्लिंकन यांनी चीनवर जोरदार आरोप करताना मानवाधिकार, वाढत्या आक्रमक विस्तारवादावरून टीका केली. चीनमुळे जगाला धोका निर्माण होत आहे. अमेरिका जगाचे संरक्षण करण्यास समर्थ आहे. अन्यथा, जगात हिंसक कारवायांमध्ये वाढ होईल, असेही त्यांनी म्हटले. अमेरिकेच्या मित्र देशांसोबत चीन करत असलेली आर्थिक बळजबरी हा फक्त त्या देशाचा अंतर्गत मुद्दा नसल्याचेही त्यांनी म्हटले.अमेरिकेच्या या आक्रमक भूमिकेवर चीनने नाराजी व्यक्त केली. पाहुण्यांसोबत असे वागण्याची ही पद्धत चुकीचे असल्याचे चीनने या वेळी म्हटले. चीनने तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, की अमेरिका हा सायबर हल्ल्यातील चॅम्पियन खेळाडू आहे. त्यामुळे चीनवर त्यांनी बोट दाखवू नये. अमेरिकेच्या आरोपाला चीननेही प्रत्युत्तर दिले. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले, की अमेरिकेने आधी आपल्या देशातंर्गत समस्येवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अमेरिका म्हणजे जगाचे नेते नाहीत. अमेरिकेची भूमिका ही एखाद्या दादागिरी करणार्‍यासारखी असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेत मानवी हक्कांची गळचेपी मोठ्या प्रमाणावर होत असून त्यांनी आकडेवारी पाहावी असेही चीनने म्हटले. जगात लोकशाही आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे काम अमेरिकेने सोडून द्यावे, असेही चीनने म्हटले. या द्विपक्षीय बैठकीआधीच वातावरण गरम झाल्यामुळे दोन्ही देशांतील ही चर्चा कितपत यशस्वी होईल, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.

Share: