IMG-LOGO
राष्ट्रीय

केंद्रीय राज्यमंत्र्यांवर बंगालमध्ये हल्ला

Thursday, May 06
IMG

व्ही. मुरलीधरन हे पश्‍चिम बंगालमधील हिंसाचारानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाचे सदस्य आहेत.

केंद्रीय पथक दाखल; हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबाना दोन लाखांची मदतकोलकाता, दि. ६ मे  : पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विविध भागांत मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडत आहे. भाजप कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ले सुरुच आहेच. आता पश्‍चिम मिदनापूर जिल्ह्यातील पंचखुंडी गावात केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. त्यातून ते बचावले; पण त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, केंद्राची चार पथके हिंसाचाराची माहिती घेण्यासाठी बंगालमध्ये दाखल झाली आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अ‍ॅक्शन मूडमध्ये आल्या आहेत. त्यांनी पोलिस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या, बदल्या केल्या आहेत, तर हिंसाचारात मृत झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. व्ही. मुरलीधरन हे पश्‍चिम बंगालमधील हिंसाचारानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाचे सदस्य आहेत. ते पश्‍चिम मिदनापूर मधील हिंसाचाराने पीडित कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. त्या वेळी भाजप कार्यकर्त्यांसोबतची बैठक आटोपून ते परत निघाले होते. त्या वेळी काही स्थानिक लोकांनी त्यांच्या गाडीवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यातून मुरलीधरन बचावले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनीच केंद्रीय मंत्र्यावर हा हल्ला केल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांनी केला आहे. दुसरीकडे, बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिकार्‍यांची चार सदस्यीय समिती बंगालमध्ये पाठवली आहे. हे पथक हिंसाचारांच्या घटनांनी प्रभावित झालेल्या परिसराचा दौरा करेल आणि पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. गृह मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या नेतृत्वाखाली हे पथक केंद्रीय गृह मंत्रालयाला आपला अहवाल सादर करेल.कोलकाता इथे पोहोचल्यानंतर हे पथक डीजी आणि गृह सचिवांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी केंद्रीय पथकाने राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. राज्य सरकारकडून अद्याप परवानगी देण्यात आली आहे की नाही, याची माहिती मिळू शकलेली नाही. पश्‍चिम बंगालमधील हिंसाचारावरून भाजाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ममता बॅनर्जी यांना जनादेश मिळाला असला, तरी ममता आपल्या तिसर्‍या टर्मची सुरुवात रक्ताने माखलेल्या हातांनी करत आहेत, अशा शब्दांत नड्डा यांनी ममता यांच्यावर हल्ला चढवला. हिंसाचारात मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या परिवारावर हल्ले करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे महिलांवरही हल्ला करण्यात आला. महिलांसोबत दुष्कर्म केले. महिला सर्वाधिक असुरक्षित आहेत. आम्ही जनादेशाचा आदर करतो; मात्र जनादेशामुळे सत्य लपून राहत नाही. लूटमार सुरू आहे. जेव्हा मी 1946 ची गोष्ट करतो, तेव्हाही रक्ताचे पाट वाहिले होते. आजही दोन मे नंतर पश्‍चिम बंगालमध्ये रक्त पाहायला मिळत आहे. मी हिंसाचाराचा निषेध करतो. आम्ही असहिष्णुतेचे विचार नष्ट करू’, असा विश्‍वास नड्डा यांनी या वेळी व्यक्त केला.             या हिंसाचारामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. ही भरपाई देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या हिंसाचारात एकूण 16 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अर्धे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते होते, अर्धे भाजपचे आणि एक कार्यकर्ता संयुक्त मोर्चाचा होता, असेही त्यांनी सांगितले.सीबीआय चौकशीची मागणीपश्‍चिम बंगालमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली. हिंसाचार घडविणार्‍यांवर काय कारवाई झाली, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Share: