आजचा निकाल तृणमूल काँग्रेसच्या बाजूने एकतर्फी होता. अटतटीची लढत झाली. आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपातीपणाची होती.
नवी दिल्ली, दि. ३ मे : आपल्या कारकीर्दीत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मोठा विजय जमा केल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सगळ्यांनाच जोरदार धक्का दिला आहे. प्रशांत किशोर यांनी निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी जे आता करत आहे, ते यापुढे करण्याची इच्छा नाही. मी खूप काम केले. आता ब्रेक घेऊन आयुष्यात वेगळे काहीतरी करण्याची वेळ आली आहे. मला निवडणूक रणनीतीकार संन्यास घ्यायचा आहे, असे ते म्हणाले. राजकारणात पुन्हा प्रवेश करणार का याबाबत विचारला असता ते म्हणाले, की मी अपयशी राजकारणी आहे. मला मागे जाऊन काय करू शकतो हे पाहायचे आहे. आसाममध्ये जाऊन चहाची शेती करायची आहे, असे मजेशीर उत्तरही त्यांनी दिले. प्रशांत किशोर म्हणाले, की आजचा निकाल तृणमूल काँग्रेसच्या बाजूने एकतर्फी होता. अटतटीची लढत झाली. आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपातीपणाची होती, त्यामुळे आम्हाला प्रचारात अनेक अडचणी आल्या. तृणमूल काँग्रेस कामगिरी चांगली करेल, याची मला खात्री होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे भाजप प्रत्येक निवडणूक जिंकेलच असे नाही. ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला करणे हे भाजपासाठी फायदेशीर ठरले नाही. पराभव झाल्यावर आपले कुठे चुकले, हे कबूल करण्यासाठी आपण तेवढे नम्र असायला हवे. ममता यांची जनतेशी संपर्क साधण्याची क्षमता कमी लेखण्यात आली. ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवरुन केलेला प्रचार पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप भाजपने केला; परंतु लोकांनीच स्पष्ट उत्तर दिले, असे प्रशांत किशोर यांनी नमूद केले. पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा गाठण्यासाठी संघर्ष करावा लागेल. याचाच अर्थ भाजपला शंभरपेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. जर भाजपला यापेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर मी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम सोडेन, असे त्यांनी सांगितले होते. त्यांनी यासंदर्भातील ट्वीट पिन देखील करून ठेवले होते. त्यांनी भाजपबाबत केलेल्या दाव्याकडे सगळ्यांचे लक्ष होते, तो आज खरा ठरताना दिसत असून ते हिरो ठरले आहेत.