दिल्लीतील महाराजा अग्रसेन हॉस्पिटलने ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
नवी दिल्ली, दि. २४ एप्रिल : देशभरात कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. काही राज्य कोरोनाच्या संक्रमणाने अधिक बाधित झाली आहेत. यात दिल्लीचादेखील समावेश आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे ऑक्सिजन, बेड्स आणि रेमडेसिवीरसारख्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. आज दिल्ली उच्च न्यायालयाने ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन चांगलाच संताप व्यक्त केला. ही कोविडची लाट नाही, तर त्सुनामी आहे. ऑक्सिजन पुरवठ्याला जर केंद्र, राज्य तथा स्थानिक प्रशासनातला कुणी अधिकारी अडथळा आणत असेल तर त्यांना आम्ही फासावर लटकवू, असा गर्भित इशाराच उच्च न्यायालयाने दिला. न्या. विपिन सांघी आणि न्या. रेखा पल्ली यांच्या खंडपीठाने संताप व्यक्त केला आहे. दिल्लीतील महाराजा अग्रसेन हॉस्पिटलने ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोरोनाची ही दुसरी लाट आहे, असे आपण म्हणत आहोत; पण खरेतर ही त्सुनामी आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला तयारीविषयी विचारणा केली. मे मध्यापर्यंत कोरोना रुग्णसंख्या शिखर गाठणार असून, केंद्र सरकारने मुलभूत आरोग्य सुविधा, हॉस्पिटल्स, वैद्यकीय कर्मचारी लस आणि ऑक्सिजन यांची काय तयारी आहे, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. ऑक्सिजन पुरवठ्याच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला म्हटले आहे, की ऑक्सिजन पुरवठा बाधित करणारे लोक कोण आहे. आम्ही त्या लोकांना फासावर लटकवू. आम्ही कुणालाही सोडणार नाही. दिल्ली सरकार तथा स्थानिक प्रशासनाने अशा अधिकार्यांबाबत केंद्राला देखील माहिती द्यावी, जेणेकरुन त्यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.