IMG-LOGO
राष्ट्रीय

काँग्रेस सत्तेत आल्यास मोदी सरकारचे शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करणार- राहुल गांधी

Sunday, Oct 04
IMG

या कायद्यांना पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक विरोध असून त्यांनी याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडले आहे.

लुधियाना, दि. ०४ ऑक्टोबर : ज्या दिवशी कॉंग्रेस सत्तेत येईल त्याच दिवशी तिन्ही कृषी कायद्यांना संपुष्टात आणून कचऱ्याच्या डब्यात फेकून देईन असे आश्वासन कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंजाबमधील जनतेला दिले आहे.राहुल गांधी म्हणाले की जर शेतकरी या नव्या कायद्यांमुळे समाधानी असतील तर देशभरात शेतकरी आंदोलन का करत आहेत. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन का करत आहेत. तसेच कोरोनाकाळात हे तीन कायदे लागू करण्याची काय घाई होती, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे. पंजाबमधील मोगा येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या शेती वाचवा यात्रेत ते बोलत होते. "मी तुम्हाला खात्री देतो की ज्या दिवशी काँग्रेस पार्टी सत्तेत येईल, आम्ही हे तिन्ही काळे कायदे मोडीत काढू आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ." या कायद्यांना पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक विरोध असून त्यांनी याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडले आहे. जर सरकारला हे कायदे संमत करून घ्यायचे होते तर सर्वात आधी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्यांच्याबाबत चर्चा व्हायला हवी होती.  शेतीचा सर्व बाजार अंबानी आणि अदानींना सोपवण्याची तयारी करत आहे. मात्र काँग्रेस पक्ष असे होऊ देणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

Share: