कोरोनाची सुरुवातीची प्रकरणे सी-फूड मार्केटच्या आसपासच्या भागाव्यतिरिक्त इतर शहरातूनही आली होती. त्यामुळे व्हायरस सी-फूड मार्केटऐवजी इतर ठिकाणाहून आला असेल
बीजिंग, दि. ११ फेब्रुवारी : कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहान शहरातून झाला. गेल्या सव्वा वर्षांपासून तेच मानले जाते. जागतिक आरोग्य संघटनेचे पथक तिथे दाखल झाले आहे. या पथकाने कोरोनाचा प्रसार वुहानच्या प्रयोगशाळेतून झालेला नाही, ही पूर्वीचीच कॅसेट वाजविली आहे. चीनने तर भारत आणि ब्राझीलमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचे सांगायला सुरुवात केली. जागतिक आरोग्य संघटनाही आता तसेच बोलायला लागली आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने 9 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदाच आतापर्यंत केलेल्या तपासाविषयी सांगितले; परंतु जे सांगितले ते जागतिक आरोग्य संघटनेच्या तपासाचा निष्कर्ष कमी आणि चीनच्या प्रपोगंडाचे समर्थन वाटत होते. तोच प्रपोगंडा ज्यामध्ये चीन कधी भारत, कधी ब्राझील तर कधी युरोपीय देशांना ओढत राहिला. तोच प्रपोगंडा ज्यामध्ये कोरोना व्हायरस चीनमधून नाही, तर अन्य देशांमधून पसरल्याचे सांगितले जात होते. ज्यास जगातील इतर कोणत्याही देशाने आत्तापर्यंत समर्थन दिलेले नाही.जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकासोबत चिनी वैज्ञानिकदेखील काम करत आहेत. चिनी वैज्ञानिकांचे प्रमुख लियांग वानियन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले, की कोरोनाची सुरुवातीची प्रकरणे सी-फूड मार्केटच्या आसपासच्या भागाव्यतिरिक्त इतर शहरातूनही आली होती. त्यामुळे व्हायरस सी-फूड मार्केटऐवजी इतर ठिकाणाहून आला असेल, असे होऊ शकते. या सिद्धांताला चीनशिवाय इतर कोणत्याही देशाने पाठिंबा दर्शविला नाही; जागतिक आरोग्य संघटनेच्या व्यासपीठावरून चीनने पुन्हा एकदा हा प्रचार केला आहे. त्यांचा इशारा भारत आणि ब्राझीलसारख्या देशांकडे होता. कारण चीनने नोव्हेंबरमध्ये दावा केला होता, की 2019 च्या उन्हाळ्यात कोरोनाची भारतात उत्पत्ती झाली. तो जनावरांद्वारे गलिच्छ पाण्यातून मानवापर्यंत पोहोचला आणि येथून जगात पसरला. डिसेंबर 2020 मध्ये चिनी शास्त्रज्ञांनी दावा केला होता, की ब्राझीलहून आलेल्या फ्रोझन फूडमध्ये कोरोनाचे जिवंत विषाणू आढळल होते; मात्र त्या वेळी जागतिक आरोग्य संघटनेने चीनचा हा दावा फेटाळून लावला होता.जागतिक आरोग्य संघटनेचे पथक 14 जानेवारी रोजी वुहानला पोहोचले. 14 दिवस ते विलगीकरणात राहिले. त्यानंतर 12 दिवस वुहानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांना या पथकाने भेटी दिल्या आणि तपास केला. या पथकाने वुहानच्या लॅबमधून विषाणू पसरल्याचा ट्रम्प यांचा दावादेखील फेटाळला. वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना पसरण्याची कोणतीही शक्यता नाही; मात्र कोरोना वुहानमध्ये कसा पोहोचला आणि तेथून जगभरात कसा पसरला याबाबत काही सांगू शकत नाही.