IMG-LOGO
राष्ट्रीय

सातव्या फेरीतही कायदे रद्द करण्यावर ठाम

Monday, Jan 04
IMG

शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून, केंद्र सरकारकडून या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी शेतक-यांसोबत चर्चा सुरू आहे.

आंदोलक शेतक-यांची भूमिका; सरकारी भोजनासही नकारनवी दिल्ली, दि. ४ जानेवारी : नव्याने करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांसह प्रस्तावित वीज बिल विधेयकाविरोधात शेतक-यांनी केंद्र सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. गेल्या 40 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. कृषी कायदे मागे घेण्यात यावे, अशी मागणी शेतक-यांकडून केली जात आहे; मात्र सरकार दुरुस्तीसाठी तयारी दर्शवताना दिसत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज चर्चेची सातवी फेरी सुरू आहे. या बैठकीतही शेतक-यांनी केंद्राला पुन्हा तोच सवाल केला.  केंद्र सरकारने कृषी क्षेत्राला खुले करण्यासाठी केलेल्या तीन कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आधी राज्यांमध्ये आंदोलन करणा-या शेतक-यांनी महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवरच बि-हाड मांडले असून, कायदे मागे घेतल्याशिवाय परत न जाण्याचा निर्धार केला आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून, केंद्र सरकारकडून या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी शेतक-यांसोबत चर्चा सुरू आहे. आतापर्यंत चर्चेच्या सहा फे-या पूर्ण झाल्या आहेत; मात्र केंद्र सरकारला कोणतेही यश आलेले नाही. दरम्यान, चर्चेची सातवी फेरी आज सुरू झाली. सुरूवातीला आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या शेतकर्‍यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शेतक-यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना कृषी कायदे रद्द करणार की नाही, असा सवाल केला. त्यावर केंद्र सरकार कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यास तयार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. चर्चा याच मुद्द्यावर अडकल्याने जेवणासाठी बैठक थांबवण्यात आली.शेतक-यांसोबत सुरू असलेल्या बैठकीत तोमर यांच्यासह रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश हे देखील सहभागी झाले आहेत. जेवणासाठी बैठक थांबवण्यात आल्यानंतर शेतक-यांनी मंत्र्यांसोबत जेवण करण्यास नकार दिला.

Share: